खडसेंच्या जावयाच्या अडचणीत वाढ, सायबर पोलिस ठाण्यात महिलेने दिली तक्रार; नेमकं प्रकरण काय?
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात सध्या कोठडीत असलेला डॉ. प्रांजल खेवलकर आणखी अडचणीत सापडला आहे. संमतीशिवाय महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात नवा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संमती न घेता व्हिडिओ आणि फोटो काढले, असा आरोप एका महिलेने तक्रारीत खेवलकरवर केला आहे. या तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
२०२२ ते जून २०२५ या कालावधीत डाॅ. खेवलकरने वेगवेगळ्या हाॅटेलमध्ये बोलावून त्यांचे निर्वस्त्र अवस्थेतील छायाचित्रे काढली. महिलेची संमती नसताना ही छायाचित्रे काढली. या छायाचित्रांचा गैरवापर केला जाण्याची शक्यता आहे, अशी फिर्याद महिलेने नुकतीच सायबर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता ७७, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६६ (ई ) अन्वये डाॅ. खेवलकरविरुद्ध गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पेन ड्राईव्ह जप्त
पोलिसांनी डाॅ. खेवलकर याचा दुसरा मोबाइल संच, कॅमेरा, लॅपटाॅप जप्त केला आहे, तसेच संबधित हाॅटेलमधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चित्रीकरण साठविणारे यंत्र (डीव्हीआर) ताब्यात घेतला आहे. उर्वरित सहा आरोपींचे मोबाइल आणि पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने पोलिसांकडून तांत्रिक तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात एका महिलेने सायबर पोलीस ठाण्यात नुकतीच फिर्याद दिल्याने खेवलकरच्या अडचणी वाढल्या आहेत.
खराडीतील हाॅटेलमध्ये पार्टीवर छापा
खराडीतील एका हाॅटेलमध्ये २५ जुलै रोजी झालेल्या पार्टीवर गुन्हे शाखेने छापा टाकला. या प्रकरणी डाॅ. प्रांजल मनीष खेवलकर, निखिल जेठानंद पोपटाणी, समीर फकीर महमंद सय्यद, सचिन सोमाजी भोंबे, श्रीपाद मोहन यादव, इशा देवज्योत सिंग, प्राची गोपाल शर्मा यांना अटक केली. आरोपींकडून २ ग्रॅम ७० मिलीग्रॅम कोकेन, ७० ग्रॅम गांजा सदृश पदार्थ, हुक्का पात्र, दहा मोबाइल संच, सुगंधी तंबाखू, दोन मोटारी, मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणातील आरोपींची न्यायालयाच्या आदेशाने येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. खराडीतील एका हाॅटेलमध्ये झालेल्या पार्टीपूर्वी आरोपींनी अशा पद्धतीच्या पार्टीचे आयोजन एप्रिल आणि मे महिन्यात केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाइलमधून महिलांशी झालेला संवाद, पार्टीची छायाचित्रे, चित्रफीत मिळाली असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते.