पुण्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? धारदार हत्यारांनी वार करत गाड्यांची तोडफोड, गुन्हा दाखल
पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरात गुन्हेगरीचे प्रमाण वाढले आहे. कोयता गॅंग, हीट अँड रन, महिलांवरील अत्याचारांचे प्रकार, अपघाताची सत्र सुरूच आहेत. तर पुण्यात सायबर क्राईमच्या घटना देखील वाढलेल्या दिसत आहेत. दरम्यान पोलीस प्रशासन देखील याबाबत कठोर कारवाई करताना दिसून येत आहे. मात्र सातत्याने अशा घटना घडत असल्याने कायदा सुव्यवस्था आहे की नाही याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चोरीच्या घटना अशा सर्वच प्रकारचे गुन्हे वाढताना पाहायला मिळत आहेत. धारदार हत्यारांनी वार करत गाड्यांची तोडफोड करून दहशत पसरविणार्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कात्रज येथील सुंदरनगर परिसरात घडला. याप्रकरणी गणेश माळवे, यश घोडके व त्यांच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुमित मारूती पंडीत (वय २७, रा. सुंदरनगर, कात्रज) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हा प्रकार २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २९ ऑक्टोबर) सुमित पंडीत आणि त्याचा भाऊ राहत्या घरासमोर बसले होते. त्यावेळी आरोपी अचानकपणे हातात हत्यार घेऊन आले. त्यांनी लागलीच सुमित यांच्या हातावर आणि पायावर वार करून त्यांना जखमी केले. तसेच जवळच पार्क केलेल्या रिक्षा, चार चाकी गाड्यांया काचा फोडल्या. तर किशोर कुचेकर व मल्लिनाथ मळवडे यांना देखील मारहाणकरून जखमी केले. नंतर हत्यारे हवेत फिरवत दहशत माजवली, असे तक्रारीत म्हटले आहे.
पुण्यात एकाच रात्रीत ५ दुकाने फोडली
पुण्यातील वर्दळीचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर एका रात्रीत पाच दुकाने फोडल्याची घटना घडली आहे. सध्या दिवाळीमुळे पुणे शहरात गर्दी वाढली आहे. बाजारपेठेत , प्रमुख मार्गांवर वर्दळ वाढली आहे. मात्र याचाच फायदा घेत चोरट्यांनी फर्ग्युसन रस्त्यावर दुकाने फोडली आहेत. चोरट्यांनी पुण्यातील प्रसिद्ध अशा फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील दुकाने फोडली आहेत. एका रात्रीत एकूण ५ दुकाने चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, चोरट्यांनी लाखोंचा माल लुटला आहे. जवळपास १.२५ लाख रुपये लुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. डेक्कन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अट्टल चोरट्यांनी दुकाने फोडली असल्याचा संशय पोलिसांना आहे.
पुण्यात दोन गटांत हाणामारी
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, पुण्यात दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांसोबतचं पोलिसही हैराण झाले आहेत. अशातच आता आळंदी रस्त्यावर असलेल्या कळस गावात पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हाणामारीत चौघे जखमी झाले असून, याप्रकरणी परस्परविराेधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल भीष्मा चव्हाण (वय २४, रा. कळस ) याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.