
फुकट वडापाव न दिल्याने विक्रेत्याला बेदम मारहाण; गल्ल्यातील रोकडही लुटली
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. फुकट वडापाव न दिल्याने विक्रेत्याला मारहाण करुन २२०० रुपये लुटून नेल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भरत बडगुजर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहन जवानजी परमार (वय ४९, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परामार यांचा बिबवेवाडी भागात वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बडगुजर हा परमार यांच्या गाडीजळ आला. त्याने परमार यांच्याकडे वडापाव मागितला. परमार यांनी पैसे मागितल्यानंतर त्याने वडापाव देण्यास नकार दिला. पैसे मागितल्याने त्याने शिवीगाळ केली, तसेच परमार यांना मारहाण करून खिशातील २२०० रुपये काढून घेतले. त्यांना धमकावून बडगुजर पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक सिसाळ अधिक तपास करत आहेत.
पुतण्याने केला चुलत्याचा खून
आर्थिक वादविवादातून पुतण्याने चुलत्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याची घटना गेल्या काही दिवसाखाली पाषाण येथे घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. महेश जयसिंगराव तुपे (वय.५६,रा. पाषाण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश यांचा मुलगा वरद तुपे (वय १९) याने तक्रार दिली आहे. त्यावरून शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०) आणि ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. सर्व पाषाण) यांना अटक केली आहे.
तरुणाला जिवे मारण्याची धमकी
धानोरीत वाद विवादातून तरुणाला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच जणांवर गु्न्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी विकी लक्ष्मण जाधव (वय ३०, रा. गोकुळनगर, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी ओंकारसिंग भोंड, गुरुदीपसिंग भोंड, जयदीपसिंग भोंड, गुरुबचन भोंड यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला. आरोपी वराह पालनाचा व्यवसाय करतात. जाधव यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत त्यांनी वराह पालन व्यवासाय सुरू केला. जाधव यांनी आरोपींना मनाई केली. त्यानंतर आरोपींनी जाधव यांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक सुडके तपास करत आहेत.