पतीने डोक्यात फरशी घालून पत्नीचा केला खून; धक्कादायक कारणही आलं समोर
सोलापूर : देशभरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे, सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते आनंद तांडा रस्त्यावरील पाटील वस्ती येथे पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वादावादी झाल्याने पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात फरशी घालून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
गौराबाई नीलकंठ पाटील (वय ६१) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर नीलकंठ भीमराव पाटील (वय ६५, रा. पाटील वस्ती, हत्तुर) असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. नीलकंठ पाटील यांची आनंद तांडा हत्तूर ते रोड दरम्यान शेती आहे. त्या परिसराला पाटील वस्ती म्हणून ओळखतात. या ठिकाणी गौराबाई आणि नीलकंठ हे दोघे राहतात. शेतातील वस्तीवर राहत असूनही गौराबाई शेताकडे लक्ष देत नव्हत्या. यामुळे त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर त्या काही दिवस परगावी असलेल्या मुलांकडे राहण्यास जात होत्या.
दरम्यान, गुरुवारी अमावास्या असल्याने गौराबाई शेतातील मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी नीलकंठ तेथे गेला. त्यांनी नेहमी शेतात येत नाही, आज कशी आली असे म्हणून गौराबाई यांना शिवीगाळ केली. त्यानंतर तेथे पडलेली फरशी उचलून गौराबाईच्या डोक्यात घातली. पुन्हा त्याच फरशीने गौराबाईला मारत राहिला. यात गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गौराबाई यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी घडलेल्या घटनेची माहिती सायंकाळी परिसरात समजली.
याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्याला माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गौराबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी पती नीलकंठ याला ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.
कोथरूडमध्ये अल्पवयीन मुलावर धारदार हत्याराने हल्ला
कोथरुड भागातील गुरू गणेश नगर येथील मधुकुंज सोसायटीत १४ वर्षीय मुलावर जुन्या भांडणाच्या रागातून धारदार हत्याराने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन तरुणांसह एका अल्पवयीन आरोपीवर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून अर्जुन धोत्रे (वय १९, रा. श्रावणधारा सोसायटी, कोथरुड), पवन वाणी (वय १८) आणि एका अल्पवयीन आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह, आर्म अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.