खेळता खेळता जिव गेला; कोल्हापुरात गळफास लागून बालकाचा मृत्यू
कोल्हापूर : आपण राज्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या अनेक घटना पाहिल्या असतील. पण आता कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घरात लाकडी जिन्याला बांधलेल्या चिंध्यांनी झोपाळा म्हणून खेळताना गळफास लागून एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समर्थ अरुण वरुटे (वय ९, रा. आरे, ता. करवीर) असे या मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. परीक्षेचा पेपर देऊन आल्यानंतर बुधवारी (दि. २३) सायंकाळी साडे पाच वाजता ही घटना घडली आहे. समर्थच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
विद्यामंदिर आरे येथे समर्थ चौथीत शिकत होता. त्याची नुकतीच परीक्षा सुरू झाली असून, शाळेत पेपर देऊन तो सकाळी अकराच्या सुमारास घरी आला. त्याचे वडील अरुण यांचे किराणा मालाचे दुकान आहे. दुपारी ते दुकानात गेले. सायंकाळी आई, चुलती, चुलते आदी घराजवळच्या शेतात काम करत होते. भाऊ अथर्व (वय १३) आणि समर्थ दोघेच घरात होते. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास अथर्व दूध आणायला गेला तेव्हा समर्थ घरीच होता. घरातील लाकडी जिन्याला असलेल्या पट्ट्यांना कापडी पट्ट्या लावून तयार केलेल्या झोपाळ्यावर समर्थ खेळत होता. खेळता खेळता त्याला गळफास लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अथर्व घरी आल्यानंतर त्याने समर्थला गळफास लागल्याचे पाहिले आणि ओरडतच तो घराबाहेर गेला. कुटुंबीयांनी समर्थला सीपीआरमध्ये दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. वरुटे कुटुंबीयांनी ६ एप्रिलला त्याचा वाढदिवस साजरा केला होता.
समर्थचे मांजरावर खूप प्रेम होते. मांजराला चिकन आणण्यासाठी तो पैसे साठवत होता. मांजर आजारी असल्याने ते काही खात-पित नव्हते. त्यामुळे त्याच्यासाठी साठविलेल्या पैशातून समर्थ चिकन आणायला जाणार होता. त्यासाठी त्याने पैसेही घेतले होते. अथर्वने सोबत चल, असे त्याला सांगितले. पण समर्थ थोडा वेळ खेळून येतो, असे म्हणाला. मांजराला चिकन आणण्यासाठी समर्थ भावासोबत गेला असता तर कदाचित तो वाचला असता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.