शेतकऱ्याच्या घरी भरदिवसा चोरी; दागिन्यांसह साडेतीन लाखांचा ऐवज चोरला
इचलकरंजी : यड्राव (ता. शिरोळ) येथे भाजीपाला तोडणीसाठी शेतात गेल्याची संधी साधून चोरट्याने शेतकऱ्याच्या घरात भरदिवसा चोरी केली आहे. कुलूप तोडून घरातील दोन तिजोऱ्या फोडून सुमारे साडेपाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख दोन हजार रुपये असा एकूण तीन लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे. इक्बाल महेर आलासे (रा. रेणुकानगर, यड्राव) यांच्या फिर्यादीनुसार याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
इक्बाल आलासे शुक्रवारी (दि. १२) दुपारी तीनच्या सुमारास कुटुंबियांसह शेतात भाजीपाला तोडणीसाठी गेले होते. त्यानंतर शेजारील नागरिकाने घराला कडी असल्याचे आलासे यांना फोनवरून सांगितले. शेजारील नागरिकाच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल केला आणि कडी काढून घराची पाहणी केली असता, दोन तिजोऱ्या फोडून साहित्य विस्कटून पडल्याचे दिसले. आलासे कुटुंबीय घरी आले आणि घरात चोरी झाल्याची माहिती शहापूर पोलिसांना दिली.
चोरट्याने दोन तिजोऱ्या फोडून त्यातील २२ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, सव्वा तोळ्याची प्रत्येकी सोन्याची पट्टी, सोन्याचे नेकलेस, सोन्याचे मिनी गंठण, पाच ग्रॅमचे टॉप्स, तीन ग्रॅमची अंगठी तसेच रोख दोन हजार रुपयांवर डल्ला मारला. घरफोडीत चोरट्याने एकूण तीन लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तिजोरीतील अन्य साहित्य अस्ताव्यस्त करून चोरट्याने पैशाची बॅग तिथेच टाकली.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद फ्लॅट फोडून तब्बल लाखोंचा ऐवज लंपास
सर्व साहित्य बेडवर विस्कटले
पैसे व दागिने शोधून तिजोरीतील सर्व साहित्य बेडवर विस्कटून टाकले. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण केले होते. दरम्यान, घटनास्थळी बाजूला क्रिकेट खेळणाऱ्यांचा सुरू असणारा गोंधळ आणि भरदुपारी नागरिकांची वर्दळ असतानाही चोरट्याने चोरीचे धाडस केले. चोरटा माहीतगार असल्याचे तपासात समोर आले आहे.
महिलांकडील मोबाइल लंपास
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.