संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात बंद फ्लॅट फोडून किंमती ऐवज चोरला जात असून, डेक्कन, कोरेगांव पार्क, वडगाव शेरी तसचे हडपसर परिसरात घरफोडीच्या घटना घडल्या असून, चोरट्यांनी तब्बल १० लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात आदित्य तापडीया (वय ४०) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार प्रभात रस्त्यावरील एका सोसायटीत राहतात. दरम्यान, ते दोन दिवसांपुर्वी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. यादरम्यान, अज्ञात चोरट्यांनी बाथरूमच्या खिडकीचे गज काढून आत प्रवेश केला. तसेच, घरातील बेडरूममधील कपाटातून १ लाख रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. तक्रारदार शनिवारी परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
यासोबतच हडपसर भागातील पापडे वस्ती परिसरातील फ्लॅट फोडून चोरट्यांनी ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत रितेश भीमरावजी पिसे (वय ३७) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच, वडगाव शेरीतील सोमनाथनगर भागात फ्लॅट फोडत ५ लाख ४७ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. १२ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. तर, दुसऱ्या घटनेत गणेशनगर भागातील एका सदनिकेतून चोरट्याने मोबाइल आणि अंगठी असा २१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
तसेच, कोरेगाव पार्क भागातील नेलर रस्त्यावर असलेल्या अतुर पार्क सोसायटीतील फ्लॅट देखील फोडत साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेले आहे. याप्रकरणी अमित सतपाल कोचर (वय ५८) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. १२ डिसेंबर रोजी मध्यरात्री चोरटा अतुर पार्क सोसायटीत शिरला. कोचर कुटुंबीय झोपेत होते. तेव्हा चोरट्याने ही चोरी केली आहे.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला घेतले ताब्यात
महिलांकडील मोबाइल लंपास
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.