कोथरूडच्या वेदभवनजवळ विचित्र अपघात; एसटी बसचा चालक अडकला अन्...
पुणे : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून, कोथरूड भागातील वेदभवन परिसरात पहाटे विचीत्र अपघाताची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, एसटी बसचा चालक अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची सुखरूप सुटका केली. परंतु, त्याच्या पायाला मार लागल्याचे सांगण्यात आले आहे. उत्तम कोकरे (वय ५०, रा. पुणे) असे जखमी झालेल्या एसटी बस चालकाचे नाव आहेत. याप्रकरणी पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीपर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्ता निसरडा झाला होता. त्यात खड्यांमध्ये पाणीही साचले होते. वाहन चालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत होती. दरम्यान, पहाटे पाचच्या सुमारास कोथरूडमधील वेदभवन परिसरात भरधाव कार समोरील एका दुसऱ्या वाहनाला धडकली. यानंतर या कारच्या पाठिमागे असलेला कंटेनर कारवर जाऊन आदळला. कंटेनरच्या पाठिमागे एसटी बस होती. एसटी बसचा वेग जास्त असल्याने नियत्रंण सुटून एसटी बस कंटेनरला जाऊन जोरात आदळली. वेग जास्त असल्याने एसटीचा बसचा समोरचा भाग मोठ्या प्रमाणात दबला गेला होता. त्यात एसटी बसचा चालक अडकला गेला.
अग्निशमन दलाला माहिती मिळताच जवान सचिन शिंदे व सहकाऱ्यांनी येथे धाव घेतली. अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. परंतु, त्याच्या छातीला तसेच पायाला जबर मार लागल्याचे सांगण्यात आले. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मोशी-चाकण मार्गावर भीषण अपघात
मोशी-चाकण मार्गावर भरधाव कारने दोन पादचारी तरुणांना धडक दिली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (१४ जून) सायंकाळी कुरुळी येथे घडली आहे. अमोल उत्तम उतेकर (वय२६, सातारा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम संतोष गोळे (वय२२, रायगड) हा जखमी झाला आहे. शुभमने याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालक संदीप किसन मोरे (वय४४, जुन्नर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.