
लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी
गंगापूर : अटक वॉरंटची कारवाई न करता मदत करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागून, तडजोडीनंतर तीन हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगेहाथ पकडण्यात आलेल्या गंगापूर पोलिस ठाण्यातील पोलिस हेडकॉन्स्टेबलने काही तासांतच गंगापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अमोल जगताप यांना पोलिस ठाण्याच्या परिसरातच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. शकील सत्तार शेख, असे संबंधित पोलिस हेडकॉन्स्टेबलचे नाव असून, त्याच्याविरुद्ध धमकीप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका ३० वर्षीय मजुराने १० सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदाराच्या नावाने अटक वॉरंट निघाले असून, त्यानुसार अटक न करता मदत करण्यासाठी हेडकॉन्स्टेबल शकील शेख यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीअंती तीन हजार रुपये स्वीकारण्याचे शेख यांनी मान्य केले. एसीबीच्या कारवाईत अटक झाल्यानंतर त्याच रात्री पोलिस ठाण्याच्या परिसरातच लोकप्रतिनिधीला धमकी दिल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिस ठाण्याच्या परिसरातच घडलेल्या या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्था आणि पोलिसांच्या वर्तनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२ (२) व ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अमोल जगताप यांना शिविगाळ करत धमकावल्याचा तक्रारीत आरोप
दरम्यान, एसीबीच्या कारवाईनंतर काही वेळातच शकील शेख यांनी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अमोल जगताप (वय ३५) यांना गंगापूर पोलिस ठाण्याच्या परिसरातच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. जगताप यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, रात्री सुमारे ११ वाजता जगताप हे त्यांचे मित्र राहुल दुर्योधन वानखेडे यांच्यासोबत पटेल टी हाऊससमोर उभे होते. त्यावेळी गणेश राजपूत यांनी स्वप्निल गणेश गायकवाड हा पोलिस ठाण्यात असल्याची माहिती दिल्यानंतर जगताप व वानखेडे मोटारसायकलवरून पोलिस ठाण्यात गेले. रात्री सुमारे ११.२८ वाजता शकील शेख हे स्वप्निल गायकवाड व चार-पाच व्यक्तींसह पोलिस ठाण्याच्या मागील बाजूने समोर आले. त्यावेळी शेख यांनी आपल्याकडे पाहून, एवढ्या कारवाईने माझे काही वाकडे होत नाही. मी परत आल्यावर तुम्हाला संपवून टाकतो. तुमची औकात नाही, नंतर दाखवतो, अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच आईवरून शिवीगाळ केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
तीन हजारांची मागितली होती लाच
एसीबीचे पर्यवेक्षक अधिकारी पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलिस निरीक्षक राजू बी. नांगलोत यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार सिनकर व पोलिस हवालदार तोडकर यांनी सापळा रचला. गुरुवारी रात्री सुमारे ११ वाजता गंगापूर पोलिस ठाण्यातील एका कक्षात तक्रारदाराकडून अँथ्रासिन पावडर लावलेली तीन हजार रुपयांची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना शकील शेख यांना एसीबी पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख यांच्या घरझडतीची कारवाईही करण्यात येत असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली.