
झोपेतून उठवल्याचा राग अनावर, नातवाने केला आजीचा खून; चऱ्होलीतील घटनेनं खळबळ
पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्या भीती निर्माण होत आहे. अशातच आता घरात सतत बडबड करून झोपेतून उठविल्याच्या रागातून नातवाने आपल्या ७५ वर्षीय आजीचा डोक्यात तांब्या मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (१७ सप्टेंबर) सकाळी चऱ्होली येथील पंतप्रधान आवास योजना म्हाडा इमारतीमध्ये घडली आहे.
माया लक्ष्मण आहिवळे ( वय ७५) असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी साईनाथ नागनाथ थोरात (वय ५०, चऱ्होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा मुलगा आरोपी स्वप्नील साईनाथ थोरात (२५, चऱ्होली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साईनाथ यांची सासू माया लक्ष्मण अहिवळे (७५) यांनी साईनाथ यांचा मुलगा स्वप्नील याला घरात घाण केली आणि झोपलेला असताना बडबड करून उठवले, या कारणावरून स्वप्निल याला राग आला. त्या रागातून स्वप्नील याने आजीच्या डोक्यात स्टीलचा तांब्या मारून तिला जमिनीवर आपटले. यात गंभीर दुखापत झाल्याने आजीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाचा दिघी पोलीस तपास करत आहेत.
जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार!
खर्डा येथील जातेगाव फाट्याजवळ शुक्रवारी (दि. ११) सकाळी सव्वानऊच्या सुमारास दूध वाहतूक करणाऱ्या चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. भरदिवसा घडलेल्या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तानाजी भास्कर बोराटे (वय ४०, रा. माळेवाडी, ता. भूम) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बोराटे हे माळेवाडी येथील कैलास धर्मा आल्हाट यांच्या पिकअपवर (एमएच १२ केपी ५६२६) चालक होते. ते रोज संकलित दूध घेऊन खर्डा येथे येत होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे दूध घेऊन आले होते. काही अनोळखी व्यक्तींनी त्यांना जातेगाव फाट्याजवळ बोलावून घेतल्याची माहिती आहे. जातेगाव फाट्याजवळ बोराटे आणि संशयितांत काही कारणावरून वाद झाल्याचे समोर आली आहे. बोराटे यांना मारहाण करताना एकाने त्यांच्या मानेवर कोयत्याने वार केल्याने बोराटे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.