संग्रहित फोटो
भोर : पसुरे- कर्नवडी (ता. भोर) येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी ( दि.२० ) रात्री घडली आहे. पतीने घराला आग लावून पत्नीला आत कोंडून पळ काढला, मात्र सुदैवाने पत्नीने दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडत आपला जीव वाचवला. या भीषण आगीत संपूर्ण घर आणि घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या असून, पोलिसांनी ५० वर्षीय आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत असे. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास याच कारणावरून पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर दुपारी ३ वाजता आरोपी घराबाहेर गेला आणि एका बाटलीत डिझेल घेऊन परतला. त्याने ती बाटली बेडरुममध्ये लपवून ठेवली आणि तो पुन्हा बाहेर निघून गेला.
रात्री साडेनऊच्या सुमारास पीडित महिला आपल्या मुलाची वाट पाहत असताना आरोपी घरात शिरला. त्याने पुन्हा वादाला सुरुवात केली आणि “घरात कोण आहे?” अशी विचारणा करत अश्लील शिवीगाळ केली. “आज तुला जाळूनच टाकतो,” असे धमकावत त्याने बेडरुममध्ये डिझेल ओतून आग लावून दिली. क्रूरतेचा कळस म्हणजे, पत्नी घरात असतानाच त्याने मुख्य दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि तिथून पळ काढला.घराने पेट घेतल्यानंतर पीडित महिलेने प्रसंगावधान राखले आणि मागच्या दरवाजातून बाहेर धाव घेतली. तिने तात्काळ शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले, मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे काही वेळातच संपूर्ण घर जळून खाक झाले. यात संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर पीडित पत्नीने भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रात्रीच घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. शनिवार (दि.२१) रोजी पहाटे आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार दिप्ती करपे करत आहेत.






