सौजन्य - नवराष्ट्र टीम
कवठे येमाई : शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गुरुवारी (दि. १९) सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास गारांसह झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. विशेषतः कवठे येमाई परिसरातील मुंजाळवाडी, ढगे माथा, येडे बोऱ्हाडे वस्ती आदी भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा व केळी यांसारखी उभी पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
दरम्यान, महसूल व कृषी विभागाने तत्परता दाखवत नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे शुक्रवारी (दि. २०) सकाळी सहा वाजल्यापासून सुरू केले आहेत. सहायक कृषी अधिकारी नंदू जाधव यांनी पहाटेच कवठे येमाई येथे दाखल होत येडे बोऱ्हाडे वस्ती, टावरे वस्ती, मुंजाळवाडी परिसरात प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करत पंचनाम्याला सुरुवात केली. दुपारपर्यंत सुमारे ९० पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.
या कामी ग्राम महसूल सहाय्यक लहू सांडभोर यांचे सहकार्य लाभत आहे. वादळी पावसामुळे अजून काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असण्याची शक्यता असून, सर्व नुकसानग्रस्तांची नोंद केली जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी पुढे येऊन नुकसानीची माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे परिसरात वीजखांब उन्मळून पडले, तर काही ठिकाणी तारा तुटल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पावसामुळे पिके उद्ध्वस्त
कवठे येमाई परिसरातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची पिके अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत. कर्ज काढून आणि मोठ्या मेहनतीने उभी केलेली पिके नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकांवरील खर्च, घेतलेली कर्जे आणि त्यांची परतफेड कशी करावी, असा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. “आता जगायचे कसे?” अशी हतबल भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
त्वरित नुकसान भरपाईची मागणी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होताच त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.






