संग्रहित फोटो
शिक्रापूर : भांबर्डे (ता. शिरूर) येथे अकरा महिन्याच्या बाळाला विहिरीत टाकून महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना तब्बल महिन्यानंतर उघडकीस आली असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मार्च २०२६ रोजी पूजा पवार ही महिला तिच्या अकरा महिन्यांच्या यश या मुलासह भांबर्डे येथून बेपत्ता झाली होती. यानंतर तिचा पती रवींद्र पवार हा पत्नी व मुलाचा शोध घेत होता. दरम्यान, पूजा जांबूत गावात एका महिलेच्या घरी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पतीने टाकळी हाजी पोलिसांच्या मदतीने तेथे जाऊन तिला ताब्यात घेतले. मात्र, तिच्यासोबत मुलगा नसल्याने चौकशी करण्यात आली असता पूजाने धक्कादायक कबुली दिली. ८ मार्च रोजी मुलगा यश हा घराशेजारी पडून हालचाल करत नसल्याने घाबरून गेल्याचे तिने सांगितले. त्यानंतर मुलाला कपड्यांच्या बॅगमध्ये ठेवून घराजवळील विहिरीत टाकल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विहिरीत शोधमोहीम राबवली. यावेळी एका बॅगमध्ये अकरा महिन्यांच्या यशचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. याप्रकरणी यश रवींद्र पवार (वय ११ महिने, रा. भांबर्डे, ता. शिरूर) याचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत रवींद्र अशोक पवार (वय ३६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पूजा रवींद्र पवार या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके करीत आहेत.
अकरा महिन्याच्या बाळाचा खून?
या घटनेमुळे बाळाचा मृत्यू अपघाती आहे की खून, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. तसेच या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत असून लवकरच सत्य समोर येण्याची शक्यता आहे.
प्रकरणाला वेगळे वळण
महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तपासात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. संबंधित महिलेने आळंदी येथे जाऊन दुसरा विवाह केल्याची माहिती मिळाली असून, या विवाहासाठी एका एजंटचा सहभाग असल्याचा संशय आहे. तसेच तिचे यापूर्वीही दोन विवाह झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.






