
माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?
माळेगाव : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता माळेगाव (बु.) येथील तावरे पेट्रोल पंप परिसरात जुन्या भांडणाचा राग मनात धरून लोखंडी कोयत्यांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. २८) रात्री घडली आहे. या हल्ल्यात तिघे जखमी झाले असून, माळेगाव पोलिसांनी गणेश भोसले, शुभम मोरे, मयूर रामचंद्र शितोळे, प्रेम कांबळे, हर्षद रणधीर, भुमेश झेंडे यांच्यासह अन्य सहा ते सात जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप दत्तात्रय जगताप (वय ४६, रा. अमरसिंह कॉलनी, माळेगाव बु.) हे आपल्या मित्रांसह तावरे पेट्रोल पंप परिसरात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी अनिकेत धुमाळ यांनी यापूर्वी झालेल्या भांडणात मध्यस्थी करून ते भांडण सोडविले होते. याच कारणाचा राग मनात धरून आरोपींच्या टोळक्याने तेथे येत धारदार लोखंडी कोयते काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींनी ‘तुम्हाला आता जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे. तसेच हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या हल्ल्यात संदीप जगताप, अनिकेत उदयसिंह धुमाळ (वय २७) आणि पृथ्वीराज अतुल निंबाळकर (वय २९) हे तिघे जखमी झाले आहे. लोक जमा झाल्याचे पाहून हल्लेखोर मोटारसायकलीवरून पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ४ व २५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळवे करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार पटारे यांनी केली.
भावानेच केला बहिणीचा खून
सख्ख्या बहिणीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आणि नंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भावाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार शर्मा यांनी हा निकाल दिला आहे. किरकोळ वादातून अन् मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केले होते. सुबोजीत साधन बासू (वय ४३, रा. अपराजिता सोसायटी, बावधन, मूळ रा. कोलकाता) असे दोषी ठरवण्यात आलेल्या भावाचे नाव आहे.