कोल्हापुर हादरलं! धारदार शस्त्राने सपासप वार करुन तरुणाचा खून; कारण काय तर...
कोल्हापूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, गोळीबार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगांरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. पोलिसही गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गस्त घालत आहेत. अशातच आता कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गंगाई लॉनजवळ रात्री साधारण दीडच्या सुमारास एका तरुणावर हल्ला करुन त्याचा खून केला आहे.
फुलेवाडी रिंग रोड परिसरात शनिवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. महेश राख (वय २७) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. धारदार शस्त्राने वार करून त्याला ठार मारण्यात आले असून, या हल्ल्यात आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला जुने वैमनस्य डोळ्यासमोर ठेवून केला आहे. या हल्ल्यात सिद्धांत गवळी, आदित्य गवळी, धीरज शर्मा, ऋषभ साळुंखे, मयूर कांबळे, पियूष पाटील, सद्दाम कुंडले यांच्यासह काही जण सहभागी होते, अशी माहिती समोर आली आहे. तलवार, एडका, फायटर, लोखंडी गज अशा घातक शस्त्रांचा वापर करून हा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, करवीर पोलीस ठाण्यात वरील सात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येच्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. मध्यरात्री उशिरा घडलेल्या या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
दोन मटण दुकान मालकांत हाणामारी
पुलाची शिरोलीतून एक मोठी घटना समोर आली आहे. ग्राहक बोलविण्यावरुन दोन मटण दुकान मालकांत हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. गावाच्या मध्यभागी मटण मार्केट आहे. या मटण मार्केटमध्ये एखादे ग्राहक आले की आपल्याच दुकानात मटण खरेदी करावे, यासाठी ग्राहकाला बोलवले जाते. यातून मोठी स्पर्धा मटण विक्री करणारे दुकान मालकांत नेहमी सुरू असते. याच कारणावरून रविवारी ग्राहकाला बोलविण्यावरून मुनाफ चिकन सेंटर व विजय मटण शॉप यांच्यात तुफान हाणामारी झाली. या मारामारीत मुनाफ नजरुद्दीन कवठेकर, रणजित विजय घोटणे, सत्यजित तानाजी घोटणे जखमी झाले. याबाबत मुनाफ कवठेकर व विजय घोटणे यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे.