
पुण्यात खळबळ! NDA मध्ये विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून केली आत्महत्या
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या प्रशिक्षणास तो हजर न राहिल्याने त्याचे सहकारी विद्यार्थी त्याच्या खोलीवर गेले होते. तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. तत्काळ खडकवासला येथील लष्करी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून सकाळी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती तात्काळ स्थानिक पोलिस तसेच मृत विद्यार्थ्याच्या नातेवाइकांना देण्यात आली आहे. घटनेचे नेमके कारण समजावे यासाठी न्यायालयीन चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
राष्ट्रीय संरक्षण अकादमीने या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना म्हटले की, “या अत्यंत दु:खद प्रसंगी एनडीए परिवार मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.” या घटनेमुळे अकादमीत शोककळा पसरली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
१८ वर्षीय अंतरीक्ष हा मूळ उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याचे वडील सुद्धा माजी सैनिक आहेत. तो पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मध्ये शिक्षण घेत होता. जुलै महिन्यात त्याने एन डी ए मध्ये प्रवेश घेतला होता आणि पहिल्या सत्रात शिकायला होता. आत्महत्या नेमकी त्याने का केली याचे कारण समजू शकलेले नाही. उत्तमनगर पोलिसांकडून तपास सुरू आहे.