पुण्यातील धनकवडीत गळफास लावून महिलेची आत्महत्या
पुणे : नणंदेसह तिच्या मुलगा, मुलगी व सुनेकडून सतत कौटुंबिक कारणावरून होणाऱ्या छळाला कंटाळून महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना धनकवडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नणंदेसह चौघांवर गुन्हा नोंदवला आहे.
वर्षा तुकाराम रणदिवे (वय ३५, रा. व्यंकटेश अपार्टमेंटसमोर, गोविंदराव पाटीलनगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उज्ज्वला बागाव (वय ५०), योगेश बागाव (वय ३५), वैशाली बागाव (वय ३२), सुवर्णा बागाव (वय २५) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तुकाराम रणदिवे (वय ४३, रा. धनकवडी) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, उज्ज्वला बागाव तक्रारदार तुकाराम रणदिवे यांची बहीण आहे. ते शेजारी-शेजारी राहतात. उज्ज्वला, तिचा मुलगा योगेश, मुलगी वैशाली व सुन सुवर्णा यांनी वर्षा रणदिवे यांना टोमणे मारुन छळ केला. कौटुंबिक कारणावरून सतत त्यांचा छळ केला जात होता. या छळाला कंटाळून वर्षा यांनी गळफास घेऊन २४ मे रोजी आत्महत्या केली.
याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. वर्षा यांचे पती तुकाराम रणदिवे यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी केलेल्या तपासात वर्षा यांनी आरोपींनी केलेल्या छळामुळे आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक निरीक्षक पवार करत आहेत.
पुण्यात आणखी एका विवाहितेचा छळ
हडपसर भागात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सलग दुसरा प्रकार या भागात घडला असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून पती, सासू, सासरे, दिरासह नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रतिक्षा अभिषेक खळदकर (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती अभिषेक आनंद खळदकर, सासरे आनंद, सासू सविता, दीर चेतन, नणंद वैभवी (सर्व रा. धनकवडी), तसेच निर्मला आवटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रतिक्षाची आई उषा राजेंद्र हरपळे (वय ४०, रा. हरपळे आळी, फुरसुंगी, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे.