
पिंपरीत भीषण अपघात! ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू; आई-वडील गंभीर जखमी
पिंपरी : राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज वेगवेगळ्या भागात अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता पिपंरी शहरातील केएसबी चौकाजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केएसबी चौकातील पुलावर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीवरील आठ वर्षीय चिमुकली हातिन फरान मोमीन हिचा मृत्यू झाला आहे. तर तिचे वडील फरान मोमीन (वय ३२), आई मारिना फरान मोमीन गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी निगडी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृत मुलीचा मृतदेह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाचा शोध सुरू करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दुर्दैवी अपघातामुळे एका चिमुकलीचा जीव गेला असून, तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हे सुद्धा वाचा : बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले
तुळजापूरची ज्योत घेऊन परतताना काळाचा घाला
नवरात्रोत्सव सुरू होण्याच्या तोंडावरच मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. तुळजापूर येथून आई तुळजाभवानीची ज्योत घेऊन आपल्या गावाकडे परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिघा तरुणांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास बीड-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव पांढरी (ता. छत्रपती संभाजीनगर) परिसरात ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे खुलताबाद तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.