
Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत
मैनपुरी कोतवाली परिसरातील कछपुरा गावातील रहिवासी ३२ वर्षीय बाबी हे जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी ते पत्नी सुमन आणि दोन मुलींसह सासरी नगला टांकन येथे गेले होते. मंगळवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास बाबी हे पत्नी सुमन, चार वर्षीय प्रियांशी आणि एक वर्षीय दिव्यांशी यांना घेऊन दुचाकीवरून गावी परतत होते. बनकिया गावाजवळ पोहोचताच मागून आलेल्या भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी कंटेनरच्या मागील चाकात अडकली.
अपघातानंतर कंटेनर चालकाने वाहन थांबवण्याऐवजी भरधाव वेगाने पुढे नेल्याचा आरोप आहे. त्यामुळे दुचाकीसह सुमन आणि त्यांच्या दोन्ही चिमुकल्या मुली तब्बल तीन किलोमीटरपर्यंत फरफटत गेल्या. या भीषण प्रकारात त्यांच्या मृतदेहांची मोठ्या प्रमाणात विटंबना झाली आणि रस्त्यावर अवशेष पसरले. दरम्यान, घर्षणामुळे दुचाकी आणि कंटेनरला अचानक आग लागली. कंटेनरमध्ये स्पोर्ट्स शूजचा साठा असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले.
कंटेनरला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने वाहन घटनास्थळीच सोडले आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सुमारे २० मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. यानंतर पोलिसांनी कंटेनरच्या चाकात अडकलेले तिघांचे छिन्नविछिन्न मृतदेह बाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
या अपघातात बाबी गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम बेवर येथील स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अपघातग्रस्त कंटेनर जप्त केला असून फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. एकाच कुटुंबातील आई आणि दोन चिमुकल्या मुलींचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने मैनपुरी परिसरात शोककळा पसरली आहे.