
Accident News: तुळजापूरची ज्योत घेऊन परतताना काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सव सुरू होण्याच्या तोंडावरच मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. तुळजापूर येथून आई तुळजाभवानीची ज्योत घेऊन आपल्या गावाकडे परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिघा तरुणांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास बीड-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव पांढरी (ता. छत्रपती संभाजीनगर) परिसरात ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे खुलताबाद तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव आणि जाफ्राबादवाडी येथील काही तरुण आई तुळजाभवानीची ज्योत आणण्यासाठी तुळजापूरला गेले होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ज्योत घेत गावाकडे परतीचा प्रवास सुरू केला. काही तरुण ज्योत घेऊन धावत होते, तर ज्योतीसाठी तेलाचा पुरवठा करणारे दोघे जण दुचाकीवरून (एमएच २० सीएस ००७४) त्यांच्यासोबत जात होते.
दरम्यान, पिंपळगाव पांढरी परिसरात मागून आलेल्या भरधाव अज्ञात कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कंटेनरने दुचाकीला तब्बल पाच किलोमीटरपर्यंत रस्त्यावरून फरफटत नेले. या दुर्घटनेत जाफ्राबादवाडी येथील रहिवासी अक्षय राजपूत याचा जागीच मृत्यू झाला. अक्षय हा काटशेरी फाटा येथे गॅरेज चालवत होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गोळेगाव येथील अमोल औटे आणि गोरख म्हस्कर यांचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शुभम आधाने हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर कंटेनरचालकाने घटनास्थळावर न थांबता वाहनासह पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी तरुणाला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार कंटेनरचालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. नवरात्रोत्सवाच्या पवित्र काळात देवीची ज्योत घेऊन परतणाऱ्या तरुणांवर काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.