तासगावात मित्रानेच केली मित्राची हत्या; कुऱ्हाड डोक्यात घालून जागेवरच संपवलं
तासगाव : देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे. अशातच आता तासगावातून एक मोठी घटना समोर आली आहे. तासगाव तालुक्यातील पाचवा मैल (निमणी) येथे शनिवारी सकाळी जुन्या वादाच्या रागातून एका व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. याप्रकरणी नागांव येथील दोघांविरोधात तासगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
मृताचे नाव चेतन उर्फ बुलट्या दुर्व्या पवार (४५, रा. पाचवा मैल, ता. तासगाव) असे आहे. याबाबत त्यांचा भाचा गणेश सुनिल काळे यांनी रोहित उर्फ बाळया पोपट मलमे (वय २६) आणि दत्तात्रय मच्छिंद्र गुजले (वय ३६) (दोघे रा. नागांव, ता. तासगाव) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलट्या पवार व रोहित मलमे हे दोघे मित्र असून, दारूच्या नादामुळे त्यांचे परस्परांशी आधीपासून वाद सुरू होते. शुक्रवारी दुपारी दोघांमध्ये पाचवा मैल येथे किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली होती. त्यावेळी रोहितने बुलट्याला “जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिली होती. शनिवारी सकाळी सुमारे अकरा ते बाराच्या सुमारास रोहित मलमे व दत्तात्रय गुजले हे डिस्कव्हर दुचाकीवरून पाचवा मैल येथे आले. बुलट्या घरासमोर दिसताच रोहितने जवळ लपवलेली कुऱ्हाड काढली आणि अचानक त्याच्यावर तुटून पडला. प्रथम दंडावर वार करून त्यानंतर डोक्यावर सलग तीन वार करत बुलट्याला जागीच ठार केले. हल्ला इतका तीव्र होता की कुऱ्हाड डोक्यात अडकली होती.
घटनेनंतर आरोपी दोघेही दुचाकीवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे, सुजन मराठे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून संशयितांना काही तासांत ताब्यात घेण्यात आले.
पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी सांगितले की, या खुनामागील कारण जुना वाद असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरूदेव काबुगडे करत आहेत. घटनेनंतर पाचवा मैल परिसरात तणावाचे वातावरण असून, मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तासगाव पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली.