
...अन्यथा तुमचा संतोष देशमुख करू; 'आप'च्या उमेदवाराला भर रस्त्यावर धमकी
सोमवार दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी साडे आठ ते नऊच्या दरम्यान यशवंत बनसोडे सासवड रोड रेल्वे स्टेशन परिसरातून कारने निघाले होते. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने हात दाखवून त्यांना वाहन थांबवण्यास भाग पाडले. वाहन थांबताच तो व्यक्ती बनसोडे यांच्या दिशेने धावून आला आणि निवडणुकीतून माघार घेण्याचा दबाव टाकू लागला. ‘माघार नाही घेतली तर तुझा संतोष देशमुख करू,’ अशी थेट जीवघेणी धमकी त्याने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादींच्या मते, त्या व्यक्तीच्या कमरेला लोखंडी शस्त्र लपवलेले होते. तसेच रेल्वे पटरीजवळ दुसरा एक व्यक्तीही उभा असल्याचे त्यांनी पाहिले. त्याच्याकडेही शस्त्र असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या बनसोडे यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक महेश नलवडे करत आहेत.
निवडणूक स्थगित असतानाच धमकी
राज्य निवडणूक आयोगाने फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेची निवडणूक स्थगित केली असून, संपूर्ण प्रक्रिया दिनांक ४ डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. निवडणूक स्थगित असताना देखील नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.