
लग्नाचे आमिष दाखवून कॅफेत नेऊन तरूणीवर अत्याचार
नागपूर : भाड्याने राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जलालखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी तिघांना न्यायालयाने तुरुंगात पाठवले आहे. तर एका आरोपीला रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
संबंधित अल्पवयीन मुलगी आणि तिचा परिवार मूळचे मध्यप्रदेशातील असून, सध्या गेल्या 10 महिन्यांपासून जलालखेडा येथे राहतात. काही काळापूर्वी ते कामाच्या निमित्ताने पोरगव्हाण (ता. वरुड, जि. अमरावती) येथे वास्तव्यास होते. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही मुलगी बाजारात साहित्य आणण्यासाठी गेली होती. मात्र, तासाभरानंतरही परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. अखेर ती सापडत नसल्याने त्यांनी जलालखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हेदेखील वाचा : पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडित ३ दिवसापासून बेपत्ता
दरम्यान, पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि शोधमोहीम राबवली. फक्त चार तासांत पोलिसांनी मुलीचा ठावठिकाणा लावत तिला नागपूरमधील ताजबाग परिसरातून ताब्यात घेतले. पीडित मुलीच्या जबाब आणि वैद्यकीय अहवालावरून तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी गोपाल धवराळ (वय 24), महेश बांदरे (वय 25), अभिषेक टेकाम (वय 23), आणि हिमांशू मनोहरे (वय 23, सर्व रा. पोरगव्हाण) यांना अटक करण्यात आली.
तिघांना न्यायालयीन तर एकाला पोलिस कोठडी
न्यायालयात हजर केल्यानंतर तिघांना न्यायालयीन कोठडी तर मुख्य आरोपी गोपाल धवराळ याला रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहन आणि ठाणेदार तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक माया वैश्य या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत, पुण्यातील राजगुरूनगरजवळील चांडोलीत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलगी आचाऱ्याला आचारी कामात मदत करत होती. त्याच आचारीने मुलीसोबत अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. आता, चांडोली येथील केदारेश्वर बंधाऱ्यावर या मुलीची ओढणी आणि चप्पल आढळून आल्याने पीडित मुलीने आत्महत्या केली काय? अशी शंका उपस्थित होत असून सध्या बंधाऱ्यात मुलीचा शोध घेतला जात आहे.
हेदेखील वाचा : देवदर्शनावरून परतताना महिलेवर काळाचा घाला; टिप्परचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू