30 हजाराची लाच मागणं भोवलं! महिला पोलीस हवालदारासह दोघांना रंगेहात पकडले
पुणे : राज्यात लाच घेतल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील महिला पोलिस हवालदारासह दोघांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 30 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. एका वकिलाकडे गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी आणि दोषारोपपत्रात मदत करण्यासाठी ही लाच घेतल्याचे उघडकीस आले आहे. महिला पोलिस हवालदार राजश्री रवी घोडे आणि सहायक फौजदार राकेश शांताराम पालांडे अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत.
घोडे आणि पालांडे हे रावेत पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदार हे पेशाने वकील आहेत. अशील यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास राजश्री घोडे यांच्याकडे होता. आरोपीस अटक न करण्यासाठी आणि दोषारोपपत्रात सोयिस्कर त्रुटी ठेवून मदत करण्याच्या मोबदल्यात घोडे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात घोडे यांच्याकडून लाच मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. तर राकेश पालांडे यांनीही या मागणीस पाठिंबा दिल्याचे उघड झाले. तसेच लाच घेताना घोडे यांना रंगेहात पकडण्यात आले, तर पालांडे यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा : पर्वती दर्शन भागात तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन्…
पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत
गेल्या काही दिवसाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत ९५ हजार रुपये स्वीकारतांना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल ३०६ अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी लाचेची मागणी केली होती. २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी नंतर ९५ हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मान्य केले होते. मात्र, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. एसीबीने धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व एका महिला अंमलदार लोखंडे यांना ताब्यात घेतले.
हे सुद्धा वाचा : दरोडेखोर अन् पोलिसांमध्ये थरार, वारजेतील घटना; नेमकं काय घडलं?