सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : वारजे माळवाडी परिसरातील म्हाडा कॉलनीत घरे फोडण्यासाठी आलेल्या एका शिकलकरी चोरट्यात अन् पुणे पोलिसांमध्ये मध्यरात्री थरार घडला आहे. चोरीच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांची गाडी आली अन् त्यांनी घेराव घालून या चोरट्याला अत्यंत थरारकरित्या पाठलाग करून पकडले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, त्याच्याकडून अडीच किलो चांदीसह चोरी करण्यासाठी लागणारे हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. त्याचे साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.
सोनू कपूरसिंग टाक (वय २९, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्यांचे नाव आहे. इतर चार ते पाच साथीदारांवर वारजे माळवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रकाश धेंडे, सहाय्यक निरीक्षक रणजित मोहिते, सचिन पाटील, उपनिरीक्षक संजय नरळे व त्यांच्या पथकाने केली आहे.
पुणे शहरातील वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी रात्र पेट्रोलिंगवर भर दिला जात आहे. यादरम्यान, वारजे पोलिस रात्री हद्दीत गस्त घालत असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास वारजेतील म्हाडा कॉलनी आणि परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. एका गाडीत बसून ते नियोजन करत होते. त्यांच्याकडे घातक हत्यारे होती. दरम्यान, त्याची माहिती या रात्र गस्तीवरील पथकाला मिळाली. लागलीच पोलिसांनी येथे धाव घेतली. पोलिसांची कार सायरन वाजत आली असता दरोडेखोरांची धावपळ उडाली.
अचानक पोलिस आल्याने दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पळाले. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर सोनू टाक याला पकडण्यात यश आले आहे. तर इतर पसार झाले. दरोडेखोर कार घेऊन दरोडा टाकण्यास आल्याचे समोर आले आहे. दरोडा व घरफोड्या करण्याच्या उद्देशाने ते आल्याचे समोर आले आहे.
घटना सीसीटीव्हीत कैद
दरोडेखोर आणि पोलिस आल्यानंतर झालेला थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून, पहाटे ३ वाजून ५५ मिनीटांनी म्हाडा सोसायटी जवळ घडला आहे. दरोड्यासाठी लागणारे सर्व धारधार हत्यारे त्याच्याकडून पकडले आहेत. पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करून पकडण्यात यश मिळविले आहे.
चांदीचे दागिने जप्त
सोनू टाक हा सराईत गुन्हेगार असून, त्याने पुण्यात विविध ठिकाणी चोरी केली आहे. त्याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात चार, नेरूळ पोलिस ठाण्यात दोन तर चतुशृंगी, सांगवी, देहू रोड आणि हिंजवडी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या सोनूकडून सव्वा तीन किलो चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.