
चरेगाव येथे डंपरच्या धडकेत युवक जखमी
उंब्रज : पाटण-पंढरपूर राज्य मार्गावर चरेगाव (ता. कराड) गावच्या हद्दीत गाळ वाहतूक करणाऱ्या डंपरची दुचाकीला धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील युवक जखमी झाला आहे. शनिवार (दि.११) सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर घटनास्थळी युवकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी निर्माण झाल्याने काही काळ तणावाचे निर्माण झाले होते. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हलगर्जीपणाने सुरू असल्याने वारंवार अपघात होत असून, स्थानिकांनी संताप व्यक्त करत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
रोहित मोहन माने (वय ३२, रा. चरेगाव ता. कराड) असे अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघातानंतर स्थानिक युवकांनी डंपरला अडवून धरत संताप व्यक्त केला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण-पंढरपूर राज्य मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. रुंदीकरणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे. पूर्वीच्या रस्त्याचे खोदकाम करून तेथे गाळ व मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे.
शनिवारी सकाळी डंपरच्या साह्याने येथे गाळ व मुरुम टाकण्याचे काम सुरू होते. त्यादरम्यान चरेगाव हद्दीत दुचाकीस्वार रोहीत माने याने पुढे वाहन उभे असल्याने दुचाकी थांबवली. तेवढ्यात पाठीमागून येणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिली. रस्ता रुंदीकरणाच्या कामात आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने व ठिकठिकाणी खोदकाम करुन ठेवल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. चरेगाव येथे रस्त्याच्या दुतर्फा लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तेथे कोणत्याही उपाययोजना न करता ठेकेदार कंपनीकडून काम सुरू आहे. त्यामुळे शनिवारी अपघाताची घटना घडली. अपघातानंतर घटनास्थळी चरेगाव येथील युवकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
दरम्यान, प्रसंगावधान राखत डंपर चालकाने केबिन आतून बंद करून घेतले. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत तो डंपरमध्येच बसून होता. पोलीस आल्यानंतर त्याने केबिनचा दरवाजा उघडला. डंपर चालकास पोलीसांनी ताब्यात घेतले. अपघातानंतर चरेगाव येथे स्थानिकांनी संताप व्यक्त करून निष्काळजीपणे डंपर चालक वाहने चालवतात. अनेक डंपर चालक दारुच्या नशेत असतात, यामुळे वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला अशी प्रतिक्रिया नागरीकांनी व्यक्त केली.