परवानगी नसतानाही अवजड वाहनांची पुण्यात 'एंट्री'; तब्बल इतक्या जणांनी गमवला जीव
पुणे : गंगाधाम चौकातील ट्रक चालकाच्या बेदरकार व निष्काळजीपणामुळे महिलेचा जीव गेल्यानंतर पुन्हा अवजड वाहनांबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरात गेल्या अडीच वर्षात अवजड वाहनांमुळे २०० प्राणांतिक अपघात झाले असून, त्यामध्ये २१४ जणांना जीव गमवावा लागला आहे. तर १६४ गंभीर अपघात होऊन त्यात १९२ जणांना कायमस्वरूपाचे अंपगत्व आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आता तरी अवजड वाहनांवर कठोर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मार्केटयार्ड परिसरातील गंगाधाम चौकात सिग्नल सुटल्यानंतर अत्यंत शिस्तीत चाललेल्या दुचाकीस्वार सासऱ्यांना व सुनेला ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. अपघातानंतर शहरात अवजड वाहनांबाबत पुन्हा तीव्र संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. मात्र, शहराच्या विविध भागांत विशेषतः औद्योगिक पट्टे, महामार्गालगतचे भाग, आणि शहराच्या प्रवेशद्वारांजवळ व मध्यभागात अवजड वाहनांची सतत ये-जा सुरु असते. त्यातही उपनगर किंवा ‘डेव्हलप’ होणाऱ्या परिसरात ट्रक, डंपर, ट्रेलर आणि टँकर यांसारखी मोठी वाहने धावत असल्याचे चित्र आहे. या वाहनांकडून वाहतूकीचे नियम देखील पाळले जात नाहीत. सोबतच भरधाव वेग, चुकीचे पार्किंग, बेदरकार व निष्काळजीपणे वाहन चालविणे असे प्रकार घडतात. त्यामुळेच अपघाताला निमत्रंण मिळत असल्याचे जानकरांचे मत आहे.
दुसरीकडे पुणे पोलिसांनी ठराविक रस्ते आणि वेळांमध्ये अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी केलेली आहे. मात्र, तरीही ही वाहने या रस्त्यांवरून सर्रास धावताना दिसत आहेत. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांवरील साहित्य ने-आण करण्यासाठी ही वाहने धावतात. वाहतूक पोलीस काही ठिकाणी कारवाई करत असले तरी, ती अपुरी ठरत आहे. बंदी मार्गावरून वाहने धावतात. अशा काही ठिकाणांवर पोलिसांचे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष असते.
हे सुद्धा वाचा : पिस्तुलाच्या धाकाने भरदिवसा 70 लाखांचे सोने लुटले; पुणे स्टेशन येथील घटना
अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग
पुणे शहरातील मुख्य रस्त्यांवरून जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग किंवा लेनची आखणी करणे आवश्यक असल्याचे मत आता पुणेकरांकडून व्यक्त केले जात असून, जेणेकरून सामान्य वाहतुकीवर त्याचा दुष्परिणाम होणार नाही.