
आजपासून सुरू झाले नवीन वर्ष
नव्या वर्षात मनात आकार घेतात नव्या अपेक्षा
नवराष्ट्रशी मान्यवरांनी साधला संवाद
सुनयना सोनवणे/पुणे: नवीन वर्ष (New Year) उजाडले की प्रत्येकाच्या मनात नव्या अपेक्षा, नवे संकल्प आणि नव्या दिशा आकार घेऊ लागतात. वैयक्तिक आयुष्याबरोबरच समाज, शिक्षण, पर्यावरण, साहित्य, संस्कृती आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठीही अनेक नामवंत व्यक्ती नव्या वर्षात ठोस संकल्प करतात. याच पार्श्वभूमीवर नवराष्ट्रने विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधून त्यांच्या नवीन वर्षातील संकल्पांचा आढावा घेतला. या संवादातून समाजहितासाठी सुरू असलेली सकारात्मक दृष्टिकोन स्पष्टपणे समोर येते.
“शिक्षण हे केवळ रोजगारासाठी नसून ते चारित्र्य निर्मितीसाठी आणि राष्ट्राच्या विकासासाठी असावे. विद्यार्थी-केंद्रित प्रशासन’ आणि ‘उद्योग-संलग्न शिक्षण’ सर्व विद्यार्थ्यांना मिळावे. तसेच प्रत्येकाला जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी सक्षम बनवणे, हाच आमचा संकल्प आहे. ‘
– पराग काळकर, प्र.कलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ .
“नवीन वर्षात शहरात जास्तीत जास्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच दोन नवीन नाट्यगगृह उभारण्यात येणार असून ते लवकरात लवकर चालू करण्यात येतील. नवोदित आणि उदयन मुख कलाकारांसाठी नवीन योजना आखल्या जातील. जसे राज्यासाठी सांस्कृतिक धोरण असते, तसेच पुण्यासाठी ही नवीन सांस्कृतिक धोरण येत्या आर्थिक वर्षात राबवले जाणार आहे.”
-राजेश कामठे,
मुख्य व्यवस्थापक, नाट्यगृह विभाग, पुणे महानगरपालिका
फुले दाम्पत्याने सुरु केली देशातील पहिली मुलींची शाळा; जाणून घ्या 01 जानेवारीचा इतिहास
“वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महामंडळाच्या वतीने अधिक प्रयत्न करण्यात येणार आहेत तसेच मराठी प्रकाशक आणि वितरक संस्थेच्या मार्फत चांगली पुस्तके वाचकांसमोर यावीत आणि नवोदय प्रकाशकांनाही संधी मिळावी त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. तसेच साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या साहित्य संमेलनाचा उत्साह शिगेला पोहोचला असून तसाच उत्साह शंभरव्या साहित्य संमेलनासाठी असेल याची तयारी आम्ही या नवीन वर्षात करणार आहोत.”
-सुनिता राजे पवार,
प्रमुख कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद
“वैयक्तिकरित्या मी जमेल तितका सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून किमान आपल्या स्वतःच्या वार्ड ऑफिस मीटिंगमध्ये सहभागी होऊन तिथे आपले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. परिसर संस्थेचा एक भाग म्हणून यावर्षी पीएमपीएमएल बस ची संख्या वाढवून सीएमपीप्रमाणे ६००० व्हावी यासाठी पाठपुरावा करणार आहे. यासाठी लोकांकडूनही मागणी यावी याचा प्रयत्न करणार आहे. तसेच शहराचे पदपथ चालण्यायोग्य व्हावे आणि पादचाऱ्यांची सुरक्षा, सायकल मार्गाची योजना अंमलात येण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”
-श्वेता वेर्णेकर, वरिष्ठ कार्यक्रम सहयोगी, परिसर संस्था
“कलावंतांच्या आरोग्यासाठी आम्ही या नवीन वर्षात काम करणार आहोत. ‘माझा कलावंत, माझं कुटुंब’ या योजनेअंतर्गत आम्ही कलावंताचा, त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा आरोग्य विमा काढणार आहोत. त्यामुळे कलावंतांच्या अकाली मृत्यूमुळे त्याचे कुटुंब आर्थिक अडचणीत येणार नाही. ”
-मेघराजराजे भोसले, अध्यक्ष, अखिल मराठी चित्रपट महामंडळ
“दादा वासवानींकडून मिळालेल्या गुरुमंत्रानुसार उर्वरित आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित करण्याचा निर्धार मी केला आहे. आगामी वर्षात किमान चार पुस्तके लिहिणे, १०० व्याख्याने व परिसंवाद घेणे, १०० युवकांना कौशल्य व रोजगार मिळवून देणे आणि दहा पेक्षा अधिक उद्योजकांना व्यवसाय वृद्धीसाठी मदत करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे हे सर्व कार्य पूर्णपणे विनामूल्य असेल.”
-डॉ.दीपक शिकारपूर, संगणकतज्ञ, लेखक, करिअर मार्गदर्शक
“मुलींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक योजना समाजाच्या तळागाळातील प्रत्येक मुलीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे हा माझा प्रमुख उद्देश असेल. राज्यात अंमलात असलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०नुसार विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास घडवून आणण्यासाठी अधिकाधिक उद्योगाभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. विद्यापीठे व महाविद्यालयांमधील शिक्षकांच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक भरतीसाठी ठोस पावले उचलली जातील. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करून शिक्षणाची एकूण गुणवत्ता वाढवणे आणि महाराष्ट्राला शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रणी बनवणे हा माझा या वर्षीचा संकल्प असेल.”
-शैलेंद्र देवळाणकर, प्रभारी संचालक, उच्च शिक्षण संचालनालय