खळबळजनक; पिस्तुलाच्या धाकाने भरदिवसा ७० लाखाचे सोने लुटले; पुणे स्टेशन येथील घटना
पुणे : शांतता राखण्यासाठी पोलीस नेमकं करतात काय? असा प्रश्न पडावा अशी स्थिती पुण्यात निर्माण झाली असून, एका बहुचर्चित कंपनीकडून सोन्याची वाहतूक केल्या जाणाऱ्या कामगाराला भल्या सकाळी आणि वर्दळ असणाऱ्या परिसरातून दोघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून 69 लाख 70 हजार 368 रुपये किमतीचे सोने लुटल्याची खळबळजनक घटना घडली. बुधवारी (दि.११) सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान, एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोघा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्रथमेश एकनाथ माने (वय 28) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अंबे एक्सप्रेस लॉजेस्टीक प्रा. लि. या कंपनीचे ग्राहकांचे विले पार्ले, मुंबई येथून घेतलेले पार्सल पुणे येथील शाखेमध्ये जमा करण्यास कंपनीचा कर्मचारी धर्मेश प्रभुलाल रेबारी (वय २१) हा पुणे रेल्वे स्टेशन समोर आला होता. त्यावेळी सकाळचे सव्वानऊ वाजले होते.
दरम्यान, तो थांबलेला असताना दोन अनोळखी व्यक्ती त्याच्याजवळ आल्या. त्यांनी काही समजण्याच्या आतच त्यातील एकाने पिस्तूल काढून ते रेबारीच्या कमरेला लावले. त्याला काहीही न बोलण्यास धमकावले. नंतर त्याच्या ताब्यातील १८ हजारांची रोकड, मोबाईल आणि अंदाजे ६९ लाख ७० हजार रुपये किंमतीचे ८ पार्सल जबरदस्तीने चोरुन नेले. ऐवज ताब्यात मिळताच दोघांनी पळ काढला. नंतर कामगाराने ही बाब तक्रारदार यांना दिली. यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, चोरट्यांचा माग काढला जात असून, वेगवेगळी पथके नेमली आहेत. गुन्हे शाखा देखील या गुन्ह्याचा समांतर तपास करत आहेत.
भरदिवसा सोने लुटल्याने खळबळ
नेहमी गर्दीने गजबजलेल्या पुणे स्टेशन परिसरात भर दिवसा सकाळी पिस्तुल्याच्या धाकाने सोने लुटण्यात आल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे धाव घेतली. दरम्यान चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली असून एका संशयीत व्यक्तीला देखील ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली.