सहकाऱ्यानेच केला घात; आरोपी सराईत गुन्हेगार
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना आता जेवणात बनवलेल्या भाजीत शाम्पूचे पाणी का टाकले, अशी विचारणा केल्याचा राग आल्याने एका मजुराने आपल्या सोबत वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय मजुराच्या डोक्यात वार करून खून केला. ही धक्कादायक घटना नाशिकच्या नांदूरशिंगोटे येथे घडली.
राजनकुमार सुरज साव (वय ३५, रा. झारखंड) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. तर आरोपी अजय गाडेकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. २०२३ मध्ये पैठण पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये तो दोन वर्षांची शिक्षा भोगून जामिनावर बाहेर आला. आरोपी अजय सुभाष गाडेकर (वय ३३, रा. छत्रपती संभाजीनगर) व खून झालेला कामगार नांदूरशिंगोटे येथे रामदास सानप यांच्या मळ्यातील खोलीत वास्तव्यास होते. हे दोघेजण मंगेश वावरे यांच्याकडे सेंट्रींग मजूर म्हणून कामाला होते. सायंकाळी सुट्टी झाल्यावर सोबत काम करणारे कामगार संगमनेर येथे निघून गेले. त्यानंतर दोघांनी जेवण बनवले.
हेदेखील वाचा : Durgapur case:’आवाज केला तर आणखी लोकांना बोलावू…’; दुर्गापूर सामुहिक अत्याचार प्रकरणातील पीडितेने सांगितली आपबिती
जेवण बनवत असताना अजय गाडेकर याने भाजीमध्ये शाम्पूचे पाणी ओतले. याचा राग आल्याने राजन कुमार याने त्याला विचारणा केली व दोघांचे भांडण झाले. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास या भांडणाचा राग मनात ठेवून गाडेकर याने खोलीत झोपलेल्या राजन कुमार याच्या डोक्यात लोखंडी गजने आघात करून त्याचा खून केला.
मंगळवारी सकाळी माहिती मिळाल्यानंतर पोलिस गणेश शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत घटनास्थळी धाव घेतली. प्रारंभी पोलिसांनी मयत राजन कुमार याचा मावसभाऊ सिंधूकुमार चलीतर साव याच्या फिर्यादीवरून आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, गाडेकर याची चौकशी केली असता त्याने खूनाची कबुली दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
खून केल्यानंतर आरोपी जीपमध्ये जाऊन झोपला
खून केल्यानंतर परप्रांतीय कामगाराला खोलीतच अंथरुणात ठेवून स्वतः गाडेकर हा खोलीच्या बाहेर उभे असलेल्या पिकअप जीपमध्ये जाऊन झोपला. मंगळवारी (दि.१४) सकाळी ६ वाजता उठल्यावर त्याने रामदास सानप यांना माझ्या सहकाऱ्याचा कोणीतरी खून केल्याचे सांगितले. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी चौकशी दरम्यान गाडेकर याची देहबोली संशयास्पद असल्याचे पोलिसांनी हेरले. नंतर पोलिसी खाक्या दाखवताच खुनाची कबुली दिली.