प्रवासी महिलेकडील दागिने चोरीला (फोटो- istockphoto)
पुणे: स्वारगेट तसेच सहकारनगर परिसरात पीएमपी प्रवासी महिलांच्या पिशवीतून ३ लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी स्वारगेट आणि सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पहिल्या घटनेत तक्रारदार या हिंगोली जिल्ह्यातील वसमतमधील आहेत. त्या कामानिमित्त १६ नोव्हेंबर रोजी पुण्यात आल्या होत्या. हडपसर ते स्वारगेट या मार्गावरील बसमधून त्या प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती.
चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून २ लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. स्वारगेट स्थानकात महिला बसमधून उतरली. तेव्हा पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक एस. पी. राठोड तपास करत आहेत. तर, पुणे-सातारा रस्त्यावर पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून ९२ हजारांचे दागिने चोरीला गेल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी घडली. तक्रारदार महिला मूळच्या नवी मुंबईतील पनवेलच्या रहिवासी आहेत. त्या शिवाजीनगर ते कात्रज या मार्गावरील बसमधून प्रवास करत होत्या. चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून ९२ हजारांचे दागिने चोरून नेले. पोलीस कर्मचारी राऊत तपास करत आहेत.
PMPML चे बस थांबे आता चोरट्यांचे अड्डे
पीएमपीएल बस ही पुणेकरांच्या रोजच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे. लाखों पुणेकर रोज याने प्रवास करतात. पुणेकरांची “जीवनवाहिनी” असलेली पीएमटी अन् त्याचे बस थांबे सध्या चोरट्यांचे अड्डे झाल्याचे वास्तव आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा चैन स्नॅचर टोळ्यांनी उचलखाली असून, बसमधील आणि थांब्यावरील गर्दीत महिला व ज्येष्ठांना टार्गेटकरून त्यांच्याकडील मोबाईल व दागिने चोरून नेत असल्याच्या धक्कादायक घटना घडत आहेत. गेल्या ११ महिन्यांमध्ये तब्बल ६६ घटना घडल्या आहेत. त्यातील केवळ १३ घटना उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. जंगजंग पछाडून देखील पोलिसांना या घटना रोखता येत नसल्याचे दिसत आहे. तर, चोरट्यांचाही थांगपत्ता लागत नसल्याचे पाहिला मिळत आहे.
शहरात गर्दीत चोऱ्या करणाऱ्या तसेच पादचारी महिला आणि नागरिकांना लुटणाऱ्या चोरट्यांनी काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. दररोज दोन ते तीन घटना सरासरी घडता आहेत. त्यातही स्वारगेट बस स्थानक व शहरातील गर्दी असणारे पीएमपीचे थांबे हे चोरट्यांचे अड्डे झाल्याचे दिसत आहे. पीएमपी बसमध्ये चढत असताना आणि प्रवासात गर्दीत हे चोरटे महिलांच्या गळ्यातील, बॅगेतील तसेच हातातील सोन्याचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरून पोबारा करत आहेत.
पीएमटी बसला सकाळी आणि सायंकाळी मोठी गर्दी असते. कार्यालये, ऑफिस तसेच शाळा व महाविद्यालये सुटल्यानंतर अनेकजन पीएमटीने प्रवास करतात. तेव्हा मोठी गर्दी असते. या गर्दीत चोरटे “मिक्स” होतात. गर्दीत धक्काबुक्की व ढकला-ढकलीचा प्रसंग होत असतो. तीच संधी साधत चोरटे हेरून दागिन्यांवर व मोबाईल डल्ला मारत असल्याचे दिसत आहे. सातत्याने त्याच परिसरात घटना होऊन देखील पोलिसांना या चोरट्यांचा माग निघत नसल्याने नेमकी पोलिसांची गस्त असते कोठे असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.






