पुण्यात ज्येष्ठ महिलेची फसवणूक (फोटो- istockphoto)
पुणे: लाडकी बहीण योजनेतील पैशांचे वाटप सुरू असल्याच्या बतावणीने चोरट्याने ज्येष्ठ महिलेकडील ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हडपसर भागात ही घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला हडपसर भागात राहायला आहेत. तीन दिवसांपूर्वी त्या सकाळी अकराच्या सुमारास हडपसर भागातून निघाल्या होत्या. त्यावेळी एका चोरट्याने त्यांना अडवले.
आमचे साहेब लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे वाटप करत आहेत. चोरट्याने त्यांना बोलण्यात गुंतविले आणि मंगळसूत्र आणि अंगठी काढून ठेवण्यास सांगितले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने दागिने चोरले. त्यानंतर चोरटा पसार झाला. पोलीस हवालदार कांबळे तपास करत आहेत.
शहरात मोफत साडी, पैसे वाटप करण्याच्या आमिषाने महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. स्वारगेट भागात चोरट्यांनी एका महिलेकडील ४० हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली.
येरवड्यात तरूणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले
येरवड्यातील सादलबाबा चौक परिसरात पहाटे तरुणाला कोयत्याच्या धाकाने लुटल्याची घटना घडली. तरुणाचा २५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि १ हजार ६५० रुपयांची रोकड असा ऐवज चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणी गेसुराज जगन्नाथ पाटील (वय २१, रा.जयजवान नगर येरवडा) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार येरवडा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण पहाटेच्या वेळी घरातून कामावर जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरून दोघे आरोपी आले. त्यांनी तरुणाला सादलबाब चौकाच्या परिसरात गाठले. त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच अॅपमधून पैसे काढून घेतले. अधिक तपास सहायक निरीक्षक साळुंके करीत आहेत.
हेही वाचा: Pune Crime News: येरवड्यात तरूणाला कोयत्याचा धाक दाखवला अन्…; आरोपींचा शोध सुरू
सराफी पेढीतून ३ लाखांचे दागिने चोरले
खरेदीच्या निमित्ताने सराफी दुकानात आलेल्या जोडप्याने ३ लाख रुपये किंमतीचे दागिणे चोरून पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धनकवडी येथील ३६ वर्षीय व्यवसायिकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी एक अनोळखी महिला आणि पुरूष अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे सातारा रोडवर सराफी दुकान आहे. मंगळवारी (दि २६) सकाळी पावने बारा वाजण्याच्या सुमारास एक महिला व एक पुरूष खरेदीच्या निमित्ताने दुकानात आले. दरम्यान, त्यांनी बोलण्यात गुंतवून तीन लाख रुपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस काऊंटरमधून चोरी केला. पुढील तपास सहायक निरीक्षक सागर पाटील करत आहेत.
शहरात सराफी दुकानात खरेदीच्या निमित्ताने येऊन दागिने चोरीच्या घटना वाढीस लागल्या असून, सिंहगड रोड येथे पुन्हा दोन घटना घडल्या आहेत. धायरी येथील ओम ज्वेलर्स आणि वडगाव बुद्रुक येथील भाग्यलक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानात या घटना घडल्या आहेत. चोरटे दुकानात आले आणि सोन साखळी पाहण्यास मागून त्या गळ्यात घालून दुचाकीवर धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे.