
Accident News: रात्रीचा प्रवास ठरला अखेरचा; म्हैसपूर फाट्याजवळ दुचाकीला आयशरची धडक, दोघांचा मृत्यू
अमरावती : अमरावती-दर्यापूर राज्य मार्गावर म्हैसपूर फाट्याजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत ऋषिकेश संजय म्हैसणे आणि संकेत गोपाल अवतीकार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ऋषिकेश म्हैसणे आणि संकेत अवतीकार हे दोघे दुचाकीवरून अमरावती-दर्यापूर मार्गाने जात होते. म्हैसपूर फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात आयशर ट्रकने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. मात्र अपघाताची तीव्रता अधिक असल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. भरधाव वाहनामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
अपघाताची माहिती मिळताच खोलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. अपघातात सहभागी असलेल्या आयशर ट्रकची ओळख पटवण्याचे तसेच चालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या अपघातामुळे अमरावती-दर्यापूर मार्गावरील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.