नवरात्रीत 8 वर्षांच्या चिमुकलीवर 'काका'नेच केला बलात्कार (Photo Credit - X)
Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे नवरात्रीसारख्या पवित्र सणादरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दुर्गा देवीची पूजा आणि मुलींचा सन्मान सुरू असताना, एका ८ वर्षांच्या निष्पाप मुलीवर तिच्याच काकाने लैंगिक अत्याचार केला. मुलगी दुर्गा मंडपात खेळत असताना काकाने तिला फसवून तिच्या घरी नेले आणि तिच्यावर घृणास्पद कृत्य केले. जर ती गप्प राहिली तर तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसल्याने तिच्या आईला ही घटना कळली. झाशी रोड पोलिस ठाण्याने एफआयआर दाखल केला आहे आणि आरोपीला अटक केली आहे.
झाशी रोड पोलिस ठाण्याजवळील नाका चंद्रवदनी येथे राहणारी ८ वर्षांची मुलगी दुर्गा मंडपात खेळत होती. आरती सुरू होणार असताना, तिचा ४५ वर्षीय काका तिथे आला आणि ‘तुला तुझा भाऊ बोलावतोय’ असे खोटे सांगून तिला घरी घेऊन गेला. मुलगी त्याच्या घरी पोहोचली, तेव्हा तिचा भाऊ तिथे नव्हता. तिने विचारले असता, त्याने तिला एका खोलीत नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तिला घरी पाठवले.
दुसऱ्या दिवशी मुलगी तिच्या भावंडांसोबत शाळेत गेली. तिची आई कपडे धूत असताना, तिला मुलीच्या पायजम्यावर रक्ताचे डाग दिसले. तिने लगेच शाळेत जाऊन मुलीला घरी आणले आणि चौकशी केली. तेव्हा मुलीने घाबरत घाबरत सर्व घटना सांगितली. तिने हे देखील सांगितले की आदल्या रात्री तिच्या पोटात खूप दुखत होते, परंतु आई रागावेल या भीतीने तिने काहीच सांगितले नाही.
घटनेची माहिती मिळताच मुलीची आई झाशी रोड पोलिस ठाण्यात पोहोचली आणि पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. तिने पोलिसांना हेही सांगितले की आरोपीने काही काळापूर्वी देखील असाच प्रयत्न केला होता, तेव्हा तिने त्याला ताकीद दिली होती, पण त्याने पुन्हा असेच कृत्य केले. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे.