खराडीत तरुणावर कोयत्याने हल्ला; तोंडावर अन् डोक्यात कोयत्याने सपासप वार
पुणे : पुण्यातील गुन्हेगारी थांबताना दिसत नाही. गुन्हेगारांच्या टोळक्यांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी नागरिक करत आहेत. अशातच आता पुण्यातून एक खळळबळजनक बातमी समोर आली आहे. खराडी परिसरात अंडाभुर्जीच्या गाडीवर किरकोळ वादातुन दोघांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डोक्यात व तोंडावर वार केल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रोहन माने (वय २२, रा. मुंढवा झेड कॉर्नर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र रोहित तानाजी चौगुले (वय २६, रा. सणसवाडी चौक सणसवाडी) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार खराडी पोलिसांनी दोघावर खूनाच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री पावने बारा ते एक वाजताच्या सुमारास रिलायन्स मार्ट समोर रिलायन्स चौक खराडी येथे घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौगुले आणि रोहन यांच्या एका मित्राची रिलायन्स चौक खराडी येथे अंडाभुर्जीची गाडी आहे. रविवारी रात्री आरोपी तेथे आले. पण, गाडी बंद केलेली होती. त्यांनी खायला देण्याची मागणी केली. त्यावेली कामगाराने गाडी बंद झाल्याचे सांगितले. त्यातून आरोपी आणि कामगाराचा वाद झाला. आरोपींनी गाडी मालकाचा नंबर घेत त्याला फोन केला. तो बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी ही माहिती त्याचे मित्र चौगुले, रोहन आणि अभि वाळके यांना दिली. हे तिघे वाद मिटविण्यासाठी अंडाभुर्जीच्या गाडीवर आले होते. तिघेजण बोलत असताना, दोन आरोपी दुचाकीने आले. त्यापैकी एकाने कोयत्याने चारचाकी गाडीची काच फोडली. त्यानंतर रोहन याच्या तोंडावर आणि डोक्यात कोयत्याने वार केले.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेला रोहन हा रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता. त्यांनतर आरोपींनी कोयता हवेत फरवून दहशत निर्माण केली. रोहनला त्याच्या मित्रांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. सध्या रोहन याची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्याप आरोपींचा शोध पोलिसांना लागलेला नसून, पथके त्यांच्या मागावर आहेत. अशी माहिती खराडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस संजय चव्हाण यांनी दिली.