संग्रहित फोटो
पुणे : गुलटेकडी येथील क्रिसेंट स्कूलमध्ये पीटीच्या तासादरम्यान मित्राशी बोलल्याच्या कारणावरून ११ वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकारानंतर पालकांच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकाविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीटी शिक्षकाने विद्यार्थ्याच्या उजव्या हातावर मारल्याने त्याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात पीटी शिक्षक मुजाहिद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विद्यार्थ्याच्या आईने तक्रार दिली आहे. ही घटना २१ ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान गुलटेकडी येथील क्रिसेंट स्कूलमध्ये घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ३० वर्षीय तक्रारदार या पुणे कॅम्पमधील सेंटर स्ट्रीट परिसरात राहतात. त्यांचा ११ वर्षीय मुलगा क्रिसेंट स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. विद्यार्थी पीटीच्या तासाला उपस्थित असताना तो आपल्या मित्राशी बोलत होता. त्यावेळी पीटी शिक्षक मुजाहिद यांना त्याचा राग आला. त्यांनी विद्यार्थ्याच्या उजव्या हातावर हाताने मारहाण केली. यामुळे विद्यार्थ्याच्या हाताला दुखापत झाली. घरी परतल्यानंतर विद्यार्थ्याने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. नंतर आईने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी शिक्षक मुजाहिद याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२) तसेच किशोर न्याय अधिनियमातील कलम ७५ आणि ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक नरेंद्र जगदाळे करीत आहेत.
गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून
लातूर जिल्ह्यात दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्याचा राग मनात धरून तरुणाने साथीदारांच्या मदतीने तरुणीच्या वडिलांचा खून केल्याची गंभीर घटना मुखेड तालुक्यातील लादगा शिवारात घडली आहे. या प्रकरणातील पसार झालेल्या तीन प्रमुख आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड आणि मुखेड पोलिसांच्या पथकाने अवघ्या पाच तासांत ताब्यात घेतले आहे. दापका राजा येथील किशन राजकुमार जोगदंड (वय २२) याच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा राग मनात धरून किशन जोगदंड याने आपल्या दोन साथीदारांसह संगनमत केले. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता लादगा शिवारातील शेतात फिर्यादीचे वडील बाबूपुंडलिक गायकवाड (वय ६०) यांच्यावर हल्ला करून त्यांचा जागीच खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या आईच्या तोंडावर चाकूने वार करून तिलाही गंभीर जखमी केले.






