संग्रहित फोटो
पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका डॉक्टरकडून तब्बल १४ लाख ३० हजार रुपये उकळल्याचा प्रकार धानोरी परिसरातून समोर आला आहे. पैसे न दिल्यास पोलिसांकडे तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ही रक्कम उकळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका ३२ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहिणी सुकुमार खेमाणे (वय ३२, रा. सुघोष अपार्टमेंट, गोकुळनगर, धानोरी, विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ४७ वर्षीय डॉक्टरांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉक्टरांचा धानोरीतील भैरवनगर परिसरात दवाखाना आहे. आरोपी महिलेची डॉक्टरांशी ओळख झाली होती. त्यानंतर महिलेने डॉक्टरांशी जवळीक वाढवत त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर महिलेने डॉक्टरांकडे वेळोवेळी पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. पैसे न दिल्यास पोलिसांकडे तक्रार करून गुन्हा दाखल करणार तसेच गुन्हा दाखल झाल्यास कारागृहात जावे लागेल, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमक्यांमुळे घाबरलेल्या डॉक्टरांकडून महिलेने गेल्या महिनाभरात टप्प्याटप्प्याने १४ लाख ३० हजार रुपये घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
दरम्यान, आरोपी महिलेने रुग्णालयातील कागदपत्रांची नोंद असलेली वही चोरून नेल्याचा आरोपही डॉक्टरांनी केला आहे. ही वही परत हवी असल्यास आणखी १० लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत पुन्हा खंडणीची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. सततच्या धमक्या आणि पैशांच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या डॉक्टरांनी अखेर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लोहकरे करीत आहेत.






