पुण्यात कामगाराकडून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल 14 लाखांना घातला गंडा
पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नागरिकाच्या देखभालीसाठी ठेवलेल्या कामगारानेच १३ लाख ९२ हजार रुपयांची फसणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कामगारावर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवकुमार पोद्दार (वय २६, रा. बलिया, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत ३८ वर्षीय व्यक्तीने हडपसर पोलिसांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांच्या देखभालीसाठी सत्यसेवा नर्सिंग सर्व्हिसेसकडून पोद्दार याला ज्येष्ठ नागरिकाची देखभाल करण्यासाठी ठेवण्यात आले होते. वर्षभरापासून तो तक्रारदाराच्या वडिलांची देखभाल करत होता. ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल बँक खात्याला जोडण्यात आला होता. पोद्दारने बँक खात्याच्या माहितीचा गैरवापर करुन खात्यातून वेळोवेळी १३ लाख ९२ हजार रुपये स्वत:च्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने हस्तांतरित केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.
ऑनलाइन टास्कच्या आमिषाने महिलेची फसवणूक
गेल्या काही दिवसाखाली ऑनलाइन काम देण्याच्या आमिषाने महिलेची १० लाख २६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला नऱ्हे येथे राहते. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. सोशल मिडीयावर पोस्ट, व्हिडीओ व ग्राफिक्स याला व्ह्यू मिळवून दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. चोरट्यांनी महिलेला प्रथम एक काम दिले. ते पुर्ण केल्यानंतर महिलेला सुरुवातीला पैसेही दिले. त्यामुळे महिलेचा विश्वास बसला. नंतर चोरट्यांनी महिलेला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. महिलेने १० लाख २६ हजार रुपये गुंतवले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा न देता तिची फसवणूक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.