
सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
सासवड : हॉस्पिटलसमोर चारचाकी गाडी आडवी लावून येण्याजाण्याचा रस्ता बंद का केला याचा जाब विचारला म्हणून १० ते १२ जणांच्या टोळक्याने वकिलासह त्याच्या पत्नीस बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ऐन वर्दळीच्या रस्त्यावर भरदिवसा प्रकार घडल्याने सासवडमधील कायदा, सुव्यवस्थेबद्दल नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तर सासवड बार असोशिएशन कडून घटनेचा जोरदार निषेध करण्यात आला आहे. आरोपींना तातडीने अटक करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सासवड बार असोशिएशनचे सदस्य प्रतिक महेंद्र बसाळे यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रांजली प्रतिक बसाळे यांना या घटनेत मारहाण करण्यात आली आहे. याबाबत सासवड पोलिसांत या घटनेची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी प्रथमेश ज्ञानेश्वर काळे, समिर उत्तम काळे, आणि हरिश जगदाळे (सर्वजण रा.काळेवाडी ता.पुरंदर) यांच्यासह इतर ८ ते १० अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अॅड प्रतिक बसाळे यांचे आईवडील सासवडमधील डॉक्टर दापत्य असून त्यांचे सोपाननगर रस्त्यावर प्रसिद्ध बसाळे हॉस्पिटल आहे. रविवारी दिनांक २० सप्टेंबर रोजी दुपारी १ च्या दरम्यान प्रतिक बसाळे त्यांच्या पत्नीसह हॉस्पिटल मध्ये जात असताना रस्त्यावरच आरोपी प्रथमेश काळे यांनी किया कंपनीची पांढऱ्या रंगाची सेल्टॉस कार नंबर एमएच १२ वाय एक्स ७४७४ गाडी रस्त्यात लावून रस्ता अडवला होता. म्हणून त्याला गाडी रस्त्यात मधोमध लावून रस्ता का बंद केला आहे असे विचारले.
त्यावर आरोपी प्रथमेश काळे याने गाडी बाजूला न घेता फिर्यादीशी वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच आरोपी प्रथमेश काळे याच्यासह समिर काळे, हरिश जगदाळे तसेच इतर ८ ते १० जणांच्या टोळक्याने अगांवर येवून शिवीगाळ करू लागले तसेच प्रतिक बसाळे यांना लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे वडील डॉ. महेंद्र बसाळे यांनी भांडणे सोडविण्याचा प्रायत्न केला असता त्यानाही आरोपींनी जोरदार मारहाण केली. तर फिर्यादी महिलेला अश्लील हातवारे, इशारे करून त्यांच्या शरीरावर हात लावून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला.
दरम्यान वर्दळीच्या रस्त्यावर भर दुपारी असा प्रसंग घडल्याने रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. सोशेल मिडीयाच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात याची जोरदार चर्चा होती. तालुक्यात कायदा, सुव्यवस्था राहिली आहे का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्यानेच अशा घटना घडत असल्याचा आरोप सासवडमधील नागरिकांनी केला आहे.
सासवड बार असोशिएशनच्या वतीने वकील मारहाण प्रकरणाचा जोरदार निषेध करण्यात आला आहे. असोशिएशनने तातडीने बैठक घेवून सर्व गुन्हेगारांना तातडीने अटक करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलीस निरीक्षक संतोष घोळवे याना भेटून लेखी निवेदन देण्यात आले आहे. बारच्या अध्यक्षा अॅड भारती जगताप, उपाध्यक्षा अॅड सरला तिवारी, सचिव ललिता झेंडे, सहसचिव श्वेता कुंजीर, खजिनदार सानिया मणियार करिष्मा डांगे तसेच पुरंदर मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण जगताप यांच्यासह असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.