
अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्...
अहिल्यानगर : राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता कापडाची व्यावसायिक असलेली महिला आणि एक तरुणी यांच्यावर वेगवेगळ्या घटनेत अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. यातील तरुणीवर दोघांनी सामुहिक कृत्य केले आहे. पहिल्या घटनेत बोल्हेगाव परिसरातील स्वामी विवेकानंद कॉम्प्लेक्सजवळ कपड्याची व्यावसायिक असलेल्या महिलेवर वॉशरूममध्ये अत्याचार झाला आहे. या प्रकरणी शेजारील गाळा मालकाविरोधात गुन्हा दाखल आहे.
ही महिला रात्री पावणेनऊच्या सुमारास तिच्या दुकानाजवळील वॉशरुममध्ये गेली होती. आतून दरवाजा लावताना तिच्या दुकानाशेजारी गाळा असलेला मालक देविदास खराद अचानक आला. त्याने बळजबरीने वॉशरुमचा दरवाजा ढकलून आतून कडी लावून घेतली. तसेच संबंधित महिलेचे तोंड दाबून तिच्या इच्छेविरुद्ध अमानुष कृत्य केले. दरम्यान, काही वेळाने संबंधित महिलेचे पती आणि दीर तेथे आले. त्यांना संशय आल्याने वॉशरुमचा दरवाजा तोडला. दरवाजा तुटल्याने आरोपी देविदास पळून जाऊ लागला. महिलेच्या पती आणि दिराने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो हाताला झटका देऊन पसार झाला.
पोलिसांनी संशयीतांना घेतले ताब्यात, २१ पर्यंत पोलिस कोठडी
दुसरी घटना देवगाव (ता. अहिल्यानगर) परिसरात घडली आहे. पवनचक्की पाहण्यास गेलेल्या २२ वर्षीय तरुणीला दोघांनी निर्जनस्थळी नेत सामूहिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलिसात दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पीडित तरुणी अहिल्यानगरमध्ये खासगी नोकरी करते. तिच्यासोबत काम करणारा २० वर्षीय तरुण तिचा मानलेला भाऊ आहे. मंगळवारी (दि. १५) सायंकाळी ते दोघे दुचाकीवरून देवगाव परिसरात पवनचक्की पाहण्यास गेले होते. साडेसहाच्या सुमारास एका पवनचक्कीजवळ थांबले असता तेथे दुचाकीवरून दोघे आले. त्यांनी त्यांना शिवीगाळ करत तरुणीसोबतच्या युवकास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तरुणीला एका दुचाकीवर आणि तरुणाला दुसऱ्या दुचाकीवर बळजबरीने बसवून घाटाच्या दिशेने निर्जन भागात नेले. तेथे दोघांचे मोबाईल हिसकावून घेत तरुणीवर अत्याचार केला. दरम्यान, तेथे आलेल्या अन्य दोघांनी पीडितेसह तिच्या मानलेल्या भावाची सुटका केली. आरोपी मात्र पसार झाले. स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवून संशयित संदेश गोरक्षनाथ शिंदे आणि मोहित अशोक खळे (दोघे रा. देवगाव) यांना ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरासह तालुक्यात संताप
घडलेल्या घटना पाहता शहरासह तालुक्यातून संपात व्यक्त होत आहे. यातील एका घटनेतील आरोपी फरार असून त्याला तातडीने अटक करण्याची तर दुसऱ्या घटेतील अटक आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.