संग्रहित फोटो
नवनाथ दिगंबर सोनार (रा. वाघोली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बाजारतळ मैदानात घडली आहे. याप्रकरणी रिक्षाचालक रामेश्वर साहेबराव माने (वय ३५) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नवनाथ याच्यावर हल्ला करण्यासाठी आरोपी तेथे आले होते. त्यांनी प्रथम कारने नवनाथला जोरदार धडक दिली. या धडकेत तो जमिनीवर कोसळला. नंतर आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी नामदेव बालासाहेब आलनुरे याने लोखंडी पाइपने नवनाथच्या डोक्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नवनाथचा मृत्यू झाला.
आरोपींपैकी एका व्यक्तीच्या बहिणीसोबत नवनाथचे संबंध असल्याचा संशय होता. या संशयातून हा हल्ला करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी नामदेव बालासाहेब आलनुरे, कैलास सुधाकर होरे, बालाजी सोनाजी धनवटे, अनिल सोपान धनवटे, अजित शिवाजी राठोड, रोहन रामचंद्र वाघमारे, अर्जुन ज्ञानेश्वर शेलार आणि नितीन लक्ष्मण उमाप ऊर्फ सोन्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शहादेव हवाले करीत आहेत.






