मुलगा नव्हे राक्षसच ! जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या; शेतीचा वाद टोकाला गेला अन्...
बुलढाणा : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारांमुळे परिसरातील नागरिकांत भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सवडद गावात मुलाने आपल्या जन्मदात्या आई वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
महादेव त्रबंक चोपडे, (वय 70 वर्ष) व कलावती महादेव चोपडे (वय 65 वर्ष) असं मृत आई वडिलांच नावं असून मुलगा गणेश महादेव चोपडे याने दोघांची हत्या केली आहे. यातील मृत आई वडील आणि आरोपी मुलगा यांच्यात जमिनीच्या विक्री करण्यावरून वाद झाला व या वादातून मुलाने आपल्या जन्मदात्यानाच संपवून टाकलं आहे. याप्रकरणी अमडापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी आरोपी गणेश चोपडे याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यातील किन्ही सवडद येथे मुलानेच आई-वडिलांची निघृण हत्या केल्याने जिल्हा पुन्हा हादरला आहे. ही थरारक घटना काल (२७ सप्टेंबर रोजी) सायंकाळी घडली. किन्ही सवडद गावातील आरोपी गणेश महादेव चोपडे (३१) याने स्वतःच्या वडिलांवर महादेव त्र्यंबक चोपडे (७०) व आई कलावतीबाई महादेव चोपडे (६५) यांच्यावर संतापाच्या भरात हल्ला केला. दोघांना बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दांपत्याचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
मृत महादेव चोपडे यांना दोन मुले आहेत. आरोपी गणेश हा धाकटा मुलगा असून, दोन्ही मुलांना जमीनीचे हिस्से देण्यात आले होते. मात्र आई कलावतीबाई यांच्या नावे असलेली जमीन विकण्याबाबत घरात वाद सुरू होता. काल त्यावरून पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात गणेशने आई-वडिलांना संपवले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाची हत्या
बीड शहरात एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. यश देवेंद्र ढाका असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. यश ढाका हा तरुण बीडमधील स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा आहे. वाढदिवस साजरा करताना झालेल्या वादातून धारदार शस्त्राने पोटात चाकू खुपसून यशची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ एका आरोपीला अटक केली आहे. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे आणखी या हत्येत इतरांचा समावेश होता का? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. महिन्याभरापूर्वी यश आणि सुरज काटे या दोघांमध्ये वाढदिवस साजरा करताना भांडण झाले. त्यामुळे त्यांच्यात वैमानस्य निर्माण झाले आणि यातूनच यशची हत्या झाल्याचे कारण समोर आले आहे.