
खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?
सपना शहराम भोसले यांनी या प्रकरणात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, माझा मामा रमेश छगन भोसले याचे व त्याचे मामा कल्याण भानुदास चव्हाण याच्यात वाद झाले होते. त्याबाबत त्यांची सून नेघा अभिषेक चव्हाण हिनेही पोलिसात तक्रार दिलेली आहे. आरोपींनी रमेश याला तू पोलिसाचा खबऱ्या होतो का, तू पोलीसांना आमच्या खबऱ्या देतो का, तुझा आता जिवच घेतो असे म्हणून तलवार, कुऱ्हाड, कोयता, लाकडी दांडक्याने रमेश भोसले याच्या डोक्यावर, हातावर, पोटावर, पायावर मारहाण केली. याच दरम्यान अभिषेक उर्फ अभी कल्याण चव्हाण याने बंदुकीने रमेश भोसले यांच्या पाठीत गोळी झाडली. धमकी देत आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासाच्या सूचना दिल्या. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे करीत आहेत.
गोळीबारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच घबराट
हल्ल्यात वापरलेली हत्यारे आणि जखमी आरोपींनी पूर्वनियोजित व आक्रमक पवित्रा घेत रमेश भोसले यांच्यावर तलवार, कुऱ्हाड, कोयता आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला. या हल्ल्यात रमेश भोसले यांच्यासह एक महिला आणि लहान मूल तसेच मध्यस्थीस आलेले इंदू नारायण भोसले व सागर नारायण भोसले हे देखील जखमी झाले. मुख्य हल्लेखोराने बंदुकीतून गोळी झाडल्यामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जखमी भोसलेची प्रकृती चिंताजनक
आरोपींनी केलेल्या गोळीबारात रमेश छगन भोसले यांच्या पाठीत गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
यांच्यावर दाखल झाला गुन्हा
सपना शहराम भोसले यांच्या फिर्यादीवरून नेवासे पोलिस ठाण्यात कल्याण चव्हाण, कुणाल चव्हाण, अभिषेक चव्हाण, हरण चव्हाण, कोमल चव्हाण, रोहित चव्हाण, उमेश भोसले आणि आकाश चव्हाण यांच्यासह एकूण दहा जणांविरूद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोघा जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.