
फटाके उडविताना वाद, तिघांवर कोयता अन् दगडाने हल्ला; नेमकं काय घडलं?
इचलकरंजी : राज्यासह देशभरातील वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे. अशातच आता ऐन दिवाळीत एक मोठी बातमी समोर आली आहे. फटाके उडविण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सहा जणांनी कोयता व दगडाने तिघांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले आहेत.
या प्रकरणी माणिक सदाशिव भंडारे (वय ५० रा. चिंतामणी गली नं. ८ कोरोची) यांनी सहा अनोळखी व्यक्तींच्या विरोधात शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी शहापूर पोलिसांनी अनिरुध्द अनिल डिंगणे (वय २६) आणि संजय प्रकाश हिटनळी (वय २५ रा. दातार मळा) या दोघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुचनावली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोची येथील माणिक भंडारे हे रात्रीच्या सुमारास आपल्या घरासमोर कुटुंबियासमवेत फटाके उडवित होते. त्यावेळी मोटरसायकलवरून निघालेल्या अनोळखी तिघांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर काही वेळानंतर त्या अनोळखी तिघांसह आणखीन तिघेजण मोटरसायकलीवरून आले व त्यांनी माणिक भंडारे, त्यांचा मुलगा रतन आणि पत्नी मनिषा भंडारे यांच्याशी पुन्हा वाद सुरु केला. त्यातूनच एकाने आता याला सोडायचे नाही म्हणत लोखंडी कोयत्याने चारवेळा माणिक यांच्या डोक्यात वार केले. त्याचबरोबर रतन आणि मनिषा या दोघांनाही शिवीगाळ करत दगड फेकून मारले. यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी अज्ञात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.