
'तू माझ्या बायकोला काय बोलला अन् वहिनीला मेसेज का केला?' पुण्यात विद्यार्थ्याला रॉडने बेदम मारहाण
पिंपरी : राज्यासह देशभरातील गुन्हेगारी थांबताना दिसत नाही. दररोज खून, हाणामाऱ्या, लुटमार, धमकावणे अशा घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात असले तरीही घटना थांबताना दिसत नाही. अशातच आता भोसरीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 18 वर्षीय विद्यार्थ्याला ओळखीच्या तिघांनी रॉड व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
ही घटना 19 ऑक्टोबर रोजी रात्री 10.45 वाजताच्या सुमारास भोसरीतील हुतात्मा चौकाजवळील परिसरात घडली आहे. जय चोटालिया (वय 19, दिघी रोड, भोसरी), स्वयंम बोऱ्हाडे (वय 22, दिघी रोड, भोसरी) आणि यश निकम (वय 22, गवळी नगर, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. वेदांत दशरथ जाधव (18, गवळी नगर, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तू माझ्या बायकोला काय बोलला आणि तू माझ्या वहिनीला मेसेज का केला? या कारणावरून फिर्यादीला लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली आहे. या घटनेत फिर्यादीच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला मार लागला असून, उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोसरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
फटाके वाजवताना वाद, तरुणावर शस्त्राने वार
कोरेगाव पार्क भागात फटाके वाजविताना झालेल्या वादविवादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ओंकार बसूराज कोळी (वय २६), शुभम बसूराज कोळी (वय २६, दोघे रा. दरवडे मळा, कोरेगाव पार्क) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत २३ वर्षीय तरुणाने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, लक्ष्मीपुजनाच्या दिवशी (२१ ऑक्टोबर) तक्रारदार तरुण आणि मित्र रात्री साडेनऊच्या सुमारास घरासमोर थांबले होते. त्यावेळी आरोपी ओंकार आणि त्याचा भाऊ शुभम घरासमोर फटाके वाजवत होते. फटाके वाजवण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपी कोेळी यांंनी तक्रारदार तरुण, त्याची आई आणि मित्राला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. त्यानंतर आरोपींनी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक हंडाळ तपास करत आहेत.