मुलगा अन् दोन नातीच्या मृत्यूच्या धक्क्याने अखेर आजोबांनीही सोडले प्राण; बारामतीतील घटना
बारामती : बारामती शहरामध्ये रविवारी हायवा ट्रकच्या धडकेत मुलासह दोन लहान नातींचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान रात्री या धक्क्याने आजोबाचेही निधन झाल्याची हृदयद्रावक घटना बारामती शहरात घडली आहे. एकाच कुटुंबातील चार जण गेल्याने बारामती परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. दरम्यान या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे.
बारामती शहरातील खंडोबा नगर येथील चौकात हायवा ट्रकने दोन लहान मुलींना घेऊन निघालेल्या ओंकार आचार्य (वय ३२) या तरुणाच्या दुचाकीला धडक दिल्याने या भीषण अपघातात पित्यासह दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या धक्कादायक घटनेमुळे बारामती परिसरावर शोककळा पसरली. दरम्यान ओंकार आचार्य यांचे सेवानिवृत्त वडील राजेंद्र आचार्य यांच्यावर आजारपणामुळे उपचार सुरू होते, त्यांना दोन दिवसापूर्वीच घरी आणण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आपल्या वडिलांना फळे आणण्यासाठी ओंकार आचार्य हा युवक आपल्या सई(वय १०) व मधुरा (वय ४) या दोघींना दुचाकीवरून निघाले होते. त्याचवेळी हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात ओंकार आचार्य हे मागील चाकाखाली गेले. शरीराचा कमरेखालचा भाग पूर्णपणे तुटला होता, तर दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या होत्या, मात्र या अवस्थेत ओंकार आचार्य याने उपस्थित लोकांना हात जोडून माझे आता काही खरे नाही, त्यामुळे तुम्ही माझ्या मुलींना तातडीने दवाखान्यात नेऊन त्यांना वाचवा, अशी विनवणी करीत होता. स्थानिक नागरिकांनी दोन्ही मुलींना उपचारासाठी हलवले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान ओंकार याने मुलींना वाचवा, अशी विनवणी केल्यानंतर प्राण सोडले. या हृदय हेलावणाऱ्या घटनेने संपूर्ण बारामतीकर हळहळले. दरम्यान आपल्या मुलासह दोन्ही नातींचा अपघाती मृत्यू झाल्याने आजारी असलेले ओंकार यांचे वडील राजेंद्र आचार्य यांचा रात्री मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चार जण गेल्याने बारामती परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
बारामती शहरातील खंडोबानगर चौकात रास्ता रोको
बारामती शहरात बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. विशेषतः हायवा ट्रक चालक बेदरकारपणे वाहने चालवतात, त्यामुळे यापूर्वी अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. खंडोबानगर चौकात वारंवार अपघात होत आहेत. रविवारी झालेल्या अपघातामध्ये लहान मुलींचा अंत झाल्याने खंडोबा नगर भागातील नागरिक संतप्त झाले. त्यांनी सोमवारी सकाळी रास्ता रोको करून या घटनेचा तीव्र निषेध केला. खंडोबा नगर चौकात गतिरोधक तातडीने बसवावे, या मागणीसाठी हा रास्ता रोको केला. उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर हे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी संध्याकाळपर्यंत या ठिकाणी गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला.