पुण्यातील मंगळवार पेठेत गोळीबार; दोघे दुचाकीवरुन आले अन्...
पुणे : पुण्याच्या मंगळवार पेठेत मध्यरात्री दुचाकींवरून ‘चकरा’ मारणाऱ्यांना विचारपूस केल्यानंतर दोघांनी धाड-धाड गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तीन फायर हवेत करण्यात आले. सुदैवाने या गोळीबारात एकही जण जखमी झाले नाही. मात्र, गोळीबाराने परिसरात चांगलेच दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. गोळीबार करणाऱ्यांमध्ये एका सराईत गुन्हेगाराचा समावेश आहे. त्यांनी हे पिस्तूल कोठून आणले होते, याचा तपास सुरू आहे.
याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात रोहित माने (वय ३०, लोहियानगर) व कासीम असीफ अन्सारी (वय २३ रा. लोहियानगर) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत ३७ वर्षीय किरण केदारी या तरुणाने तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवार पेट भीमनगर कमानीजवळ रात्री दीडच्या सुमारास तक्रारदार किरण केदारी, त्याचे मित्र शाम गायकवाड, अशपाक शेख व संतोष कांबळे हे सर्वजन थांबलेले होते. ते गप्पा मारत असताना दुचाकीवरून दोघे चकरा मारू लागले. त्यामुळे चौघांनी त्यांना हटकले. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. वादावादीचे रुपांतर शिवीगाळापर्यंत गेले. तसेच, वाद वाढला. तेव्हा अन्सारी याने त्याच्या कंबरेला लावलेले पिस्तूल बाहेर काढत त्यांच्या दिशेने गोळी झाडली. नंतर दोन गोळ्या हवेत फायर केल्या. गोळीबार झाल्याने तरुण घाबरले. तेथून पळून गेले.
काही वेळाने पुन्हा ते चौकात आले असता रोहित माने हा त्याठिकाणी पुन्हा पायी चालत आला. त्यांना आपल्याला प्रकरण मिटवायचे आहे, असे सांगून त्याने बोलण्यास सुरूवात केली. त्यावेळी चौघांनी माने याला पकडून पोलिसांना घटनेची माहिती दिली. नंतर फरासखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फरार झालेल्या अन्सारी याला देखील पकडले. दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडे पिस्तूलाबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.