चिमुरडीला मामाकडून अमानुष मारहाण, फलटणमधील संतापजनक प्रकार
फलटण : राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गन्हेगारीसंदर्भातल्या घडामोडी उघडकीस येत असतात. अशातच आता फलटणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. फलटण शहरातील उपनगरात राहत असलेल्या एका केवळ ९ वर्षाच्या चिमुरडीला तिच्या सख्ख्या मामाने अमानुषपणे मारहाण केली असून, या मारहाणीमुळे संबंधित चिमुरडीच्या मनावर आघात झाला आहे. घडलेला मारहाणीचा प्रकार चिमुरडीने तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर ही घटना समोर आली आहे. दरम्यान, मामाच्या विरोधात चिमुरडीचे पिता फलटण शहर पोलिस ठाण्यात गेले असता शहर पोलिसांनी अक्षरश: त्यांना हाकलून लावले. शेवटी हतबल झालेल्या पित्याने सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे धाव घेवून तक्रार मांडली आहे.
फलटण शहरातील उपनगरामध्ये संबंधित चिमुरडी आपल्या आजोळी राहत असते. तिच्या आई-वडिलांचा न्यायालयात घटस्फोटासंबंधी खटला प्रलंबित आहे. असे असताना संबंधित चिमुरडी कधी पित्याकडे, तर कधी आईकडे राहत असते. दरम्यान, दिनांक २४ जुलै २०२५ रोजी क्षुल्लक कारणावरुन चिडून जावून संबंधित चिमुरडीच्या मामाने तिला अमानुष मारहाण केली. यावेळी उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी संबंधित मामाला मारहाण करण्यापासून रोखले. तरीही या मामाचा राग शांत झाला नाही. मारहाणीमुळे संबंधित चिमुरडी भेदरली होती. नात्यातीलच काही लोकांनी ही घटना मुलीच्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ त्यांच्या घराकडे धाव घेतली.
कैफियत मांडणारा व्हिडिओही दाखवला
मारहाण झाल्याची खात्री झाल्यानंतर संबंधित पित्याने फलटण शहर पोलिस ठाणे गाठले. यावेळी माझ्या मुलीला तिच्या मामाने बेदम मारहाण केली आहे. संबंधित मुलीचा आपण जबाब घेऊन मामावर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र फलटण शहर पोलिसांनी मात्र संबंधित पित्याला जे काही असेल ते उद्या बघू, असे म्हणून पिटाळून लावले. वारंवार त्यांनी फलटण शहर पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवले. मात्र, शहर पोलिसांनी याकडे कानाडाेळा केला. अखेर संबंधित चिमुरडीच्या पित्याने जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे धाव घेऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली. संबंधित चिमुरडीचा कैफियत मांडणारा व्हिडिओही दाखवला. यानंतर पोलिस अधीक्षक दोशी यांनी याबाबत संबंधित ठाणेदाराला फोनवरुन सूचना देत याबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत.
पुण्यातील संतापजनक प्रकार
पत्नी नांदायला न आल्याच्या रागातून तिचा गळा चिरून निर्घृण खून केल्यानंतर पसार झालेल्या पतीला विमानतळ पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली आहे. खांदवेनगर परिसरात ही घटना घडली होती. प्रेम उत्तम जाधव (रा. खांदवेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, ममता प्रेम जाधव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. २७ जुलै रोजी रात्री ही घटना घडली होती.