
मध्यरात्री घरात शिरला, महिलेचे तोंड दाबले अन्...; पुणे जिल्ह्यातील संतापजनक प्रकार
शिवप्रसाद भदई यादव असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या नराधमाचे नाव आहे. करंदी (ता. शिरुर) येथील शिक्रापूर- चाकण रस्त्यालगत राहणारी महिला घरात झोपलेली असताना मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास अंधारात एका नराधमाने दरवाजाची कडी उघडून घरामध्ये प्रवेश केला. महिलेला दमदाटी करुन तोंड दाबले. आरडाओरडा केल्यास मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. कोणाला काही बोलली व आरडाओरडा केला तर बघ अशी धमकी देऊन नराधम पळून गेला होता.
घडलेल्या प्रकाराबाबत पिडीत महिलेने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना पुन्हा सदर आरोपी महिलेच्या घराच्या परिसरात फिरत असल्याचे पिडीत महिलेला दिसल्याने महिलेने शिक्रापूर पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी शिवप्रसाद भदई यादव (वय ३४ वर्षे) याला अटक करत चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल देशमुख हे करत आहेत.
पुण्यात तरुणीने तरुणाला लूटले
इंस्टाग्रामवर ओळख अन् त्यातून होणाऱ्या फसवणूक प्रकरणात वाढ होत असतानाच आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीने भेटीचं आमिष दाखवून तरुणाला भेटण्यास बोलावले, नंतर कात्रज घाटात जाऊ म्हणत त्याला रस्त्यात थांबवून साथीदारामार्फत लुटल्याचा प्रकार घडला आहे. त्याला पोस्कोनुसार गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील या टोळीने दिली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तरुणीसह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २८ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.