कोल्हापूरच्या चंदगड येथील भरवस्तीत एटीएम फोडले
कोल्हापूर : चंदगड येथील भर वस्तीतील एटीएम फोडून 18 लाख रुपये कारमधून घेऊन पलायन करत असताना पोलिसांनी गाडीचा पाठलाग केला असता पोलीस गाडीला धडक देऊन आरोपीने पलायन केले. हे सर्व आरोपी राजस्थानचे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली. तसेच रोख रक्कम सहा हजार घटनास्थळावर मिळून आले आहेत.
शनिवारी रात्री बाराच्या सुमारास क्रेटा या पांढऱ्या गाडीतून पाच ते सहा जण आले होते. त्यांनी एटीएमजवळ जाऊन केबिनमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर पाठीमागे गाडीत असलेल्या दोघांनी गॅस कटर घेऊन एटीएम फोडले. या एटीएममधील 18 लाख रुपये एका गाडीत भरून पुन्हा गाडीत आले. एटीएममध्ये आत जात असताना त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून कॅमेरे बंद केले. हे सर्व आरोपी काळे मफलर तोंडाला बांधून आले होते.
ही घटना काही लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधला. पोलिसांनी वायरलेस यंत्रणेद्वारे सर्व पोलीस स्टेशनला फोन करून सर्वत्र नाकाबंदी करून टाकली. त्याचबरोबर पोलिसांनी या गाडीचा पाठलाग सुरू केला.
सदरची ही गाडी मार्गे गडहिंग्लजच्या दिशेने सुसाट धावत होती. हेब्बळच्या घाटात गाडी आल्यानंतर चोरट्यांनी मातीचा धुरळा उडवल्याने पोलिस गाडीच्या चालकास पुढील काही दिसले नाही. त्यामुळे पोलिसांची गाडी त्याच ठिकाणी थांबली. पुन्हा चोरट्याची ही गाडी सुसाट दिशेने पुढे गेली. या दरम्यान हेबाळ येथे नाकाबंदी करण्यासाठी लावलेले ब्रॅकेट्स चोरट्याच्या गाडीने तोडून पलायन करू लागले. पुन्हा या गाडीचा पाठलाग पोलिसांनी सुरू केला दरम्यान चोरट्यांचा गाडीचा टायर पंचर झाला. तरी सुद्धा त्याच स्थितीत ही गाडी घेऊन चोरटे पलायन करू लागले होते.
गाडी रस्त्यावरच सोडून पलायन
सुमारे तीन किलोमीटर अंतरावर ही गाडी गेली असताना त्यांनी गाडी त्याच ठिकाणी टाकून गाडीतील रक्कम घेऊन पलायन केले. ही रक्कम घेऊन जात असताना यातील सहा हजार रुपये त्याच ठिकाणी पडले होते. तर एका चोरट्याचा एक मोबाईल तसेच गाडीची कागदपत्रे मिळून आली आहेत. सदरची ही गाडी मुंबई पासिंगची असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.